पुणे – शहरात करोनाच्या चाचण्या करण्यासाठी “एनआयव्ही’सह खासगी प्रयोगशाळांच्या एकूण तपासणी क्षमतेच्या तब्बल 91 टक्के चाचण्या केल्या जात आहेत. शुक्रवारी दिवसभरात तब्बल 1,642 चाचण्या करण्यात आल्या आहेत. शहरातील एकाच दिवशी करण्यात आलेला चाचण्यांचा हा विक्रम आहे. तर चाचण्याची संख्या वाढल्याने लागण झालेल्या रुग्णांचा आकडा वाढणार असून वेळीच संक्रमित व्यक्तींची तपासणी झाल्यास या साथीला अटकाव घालण्यास मदत होणार आहे.
शहारात 9 मार्च रोजी पहिला करोनाबाधित रुग्ण सापडला होता. त्यानंतर शहरात केवळ “एनआयव्ही’मध्ये चाचण्या केल्या जात होत्या. त्यानंतर केंद्राने लष्करी वैद्यकीय महाविद्याय आणि बी.जे. मेडिकल कॉलेजला परवानगी देण्यात आली. त्यानंतर काही खासगी लॅबलाही परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे आता शहरातील एका दिवसाची तपासणी क्षमता 1,800 वर गेली आहे. तर आतापर्यंत शहरात पालिकेची केवळ 7 ठिकाणीच नमुने घेण्याची सुविधा होती. मात्र, आता त्यात वाढ करण्यात आली आहे. परिणामी, प्रत्येक दिवसाचे नमुने संकलन वाढले आहे.
आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार,5 मे रोजी 998 जणांचे नमुने घेण्यात आले होते. त्यानंतर 6 मे रोजी हा आकडा 896 होता तर 7 मे रोजी हा आकडा पहिल्यांदा हजारावर म्हणजे 1,057 नमुने होता. तर शुक्रवारी 8 मे रोजी तो विक्रमी म्हणजे 1,642 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. एकूण तपासणी क्षमतेच्या तब्बल 91 टक्के इतके हे प्रमाण आहे. परिणामी,वेळीच चाचण्या झाल्याने बधितांचे ट्रेसिंग करून या साथीला अटकाव घालणे शक्य होणार आहे.