जळगाव – विशेष लेखापरीक्षकाला 5 लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली आहे. एसीबीच्या या कारवाईने जळगाव जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. सखाराम कडू ठाकरे असे लाच घेताना अटक केलेल्या विशेष लेखापरीक्षकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, यावल तालुक्यातील श्री महालक्ष्मी सहकारी नागरी ही पतसंस्था अवसयानात निघाली. या संस्थेचे सावदा येथील राजे छत्रपती संभाजीराजे व्यापारी संकुल कार्यालयाच्या गाळ्याची भरलेली सुरक्षित अनामत रक्कम नगर परिषदेच्या दप्तरी तक्रारदाराच्या नावे पत्र व्यवहार करून वर्ग करून देण्यासाठी ठाकरे यांनी लाच मागितली होती. सखाराम ठाकरे हे सहकारी संस्थेचे विशेष लेखापरीक्षक आहेत. त्यांनी तक्रारदाराकडे तब्बल पाच लाख रुपयांची मागणी केली होती.
मात्र तक्रारदार यांना लाच द्यायची नसल्याने त्यांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. या तक्रारीच्या आधारे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पाचोरा येथे जाऊन धुळे येथील सहकारी संस्थेचे विशेष लेखा परीक्षक सखाराम ठाकरे याला पाच लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक केली. याप्रकरणी सखाराम ठाकरे यांच्यावर एसीबीकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच धुळे एसीबीने जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथील तहसील कार्यालयातील फौजदारी लिपिक दीपक बाबूराव जोंधळे यास अडीच हजारांची लाच घेताना अटक करण्यात करण्यात आली होती.