सोलापूर (प्रतिनिधी) – भारताच्या समुद्र किनारपट्टीवर नेहमी वावर असणारा समुद्र ढोकरी हा पक्षी उजनी जलाशयात आढळून आला आहे. महाराष्ट्र राज्याच्या सागरी किनाऱ्यावरील खडकाळ प्रभागात आढळणाऱ्या बगळ्यांच्या प्रकारातील आगळावेगळा काळ्या रंगाचे बगळे आढळून आल्यामुळे पक्षीप्रेमींमध्ये उत्साह संचारला आहे. पक्षी निरीक्षक स्वप्निल भोसकर यांनी या बगळ्यांची नोंद केली आहे.
समुद्री तटावरील खडकाळ प्रदेशातील खेकडे, शिंपले व विविध प्रकारच्या मृदुकायी प्राण्यांना टिपत वावरणाऱ्या या बगळ्याला कोकणात काळा बगळा, समुद्र ढोकरी, कुकी, कोटी, कोळी व काळी बकी अशी नावे आहेत. समुद्रकाठच्या खाड्यांमध्ये व खारफुटीच्या (मॅंग्रूव्ह) जंगलामध्ये यांचा वावर असल्यामुळे त्यांना इंग्रजीत ‘रीफ हेराॅन ‘ असे नाव आहे.
ओहोटीच्या वेळी उघड्या पडलेल्या खडकांच्या डबक्यातील मासे व अन्य समुद्री जलचरांवर हे पक्षी उदरनिर्वाह चालवतात. मालवणच्या सिंधुदुर्ग किल्ल्याच्या प्रवेश द्वाराजवळ, देवगड तालुक्यातील कुणकेश्वर मंदिर व विजयदुर्ग परिसरात, मुंबईच्या हाजी अलीच्या तसेच महालक्ष्मीच्या खडकावर हे पक्षी पर्यटकांना हमखास नजरेस पडतात.
हे बगळे क्वचित प्रसंगी समुद्रापासून दूर असणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातील पठारी प्रदेशात भटकंती करत येतात व तेथील जलस्थानांवर लहान, मध्यम व मोठ्या बगळ्यांच्या समूहात त्यांच्याशी सलगी करून वावरताना दिसतात.
या पूर्वी २०१० साली जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील फोंडशिरस गावाच्या शिवारातील तलावात काळा बगळा आढळल्याची नोंद झाली आहे. पावसाळ्यापूर्वी हे स्थानिक स्थलांतर करून आलेले बगळे परत समुद्राकडे परत निघून जातात.
– डॉ. अरविंद कुंभार, ज्येष्ठ पक्षी अभ्यासक