पाच हजार हेक्टरवर परतीचा फेरा

बळीराजावर आस्मानी संकट : बदलत्या हवामानामुळे भातपिकांचे नुकसान 

पिंपरी – अवकाळी पावसाचा मावळ तालुक्‍यातील 191 गावांतील भातपिकाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे मावळातील सुमारे पाच हजार हेक्‍टर क्षेत्राला फटका बसला. भातपिकाला पवन, आंदर व नाणे मावळात इंद्रायणी, फुले समृद्धी या मुख्य वाणाबरोबरच पार्वती, सोनम, पवना तसेच काही स्थानिक वाणाला परतीचा तडाखा बसला आहे.

यंदाचा समाधानकारक पावसामुळे तालुक्‍यातील भातपीक “हेल्दी रिपोर्ट’ कृषी विभागाने दिला असताना अखेरच्या टप्प्यात लांबलेल्या परतीच्या पावसामुळे बळीराजाच्या हाताशी आलेल्या भातपीक पाण्यात गेल्याने शेतकरी आस्मानी संकटात सापडला आहे.

मावळ तालुका हा भाताचे आगार असून, बहुतेक शेतकरी खरीप हंगामात भात पीक घेतात. भात पिकासाठी प्रसिद्ध असलेल्या मावळात इंद्रायणी हे वाण प्रामुख्याने घेतले जाते. तसेच फुले समृद्धी, पवना यांचेही काही प्रमाणात पीक घेतले जाते. पीक चांगले यावे याकरिता यंदा शेतकऱ्यांनी भात लागवडीकरिता चार सूत्री तंत्रज्ञान वापरले होते. चारसूत्री शेती तंत्रज्ञान सोपे, शास्त्रीयदृष्ट्‌या कार्यक्षम आणि एकूण लागवडीचा म्हणजे बी, मजूर व खत यांचा खर्च कमी करणारे, वातावरणाचे प्रदूषण टाळणारे व भातशेती निश्‍चितपणे फायदेशीर करणारे ठरले आहे. एकीकडे समाधानकारक कृषी संदेश असतानाच परतीचा पाऊस लांबला आणि शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या पीक पाण्यात घातले.

पवन मावळ, नाणे मावळ आणि आंदर मावळ या प्रमुख तीन विभागात भात पिकाची लागवड ही टप्प्याटप्प्याने होत असते. मावळात यंदा 12 हजार 664 हेक्‍टर क्षेत्रावर लागवड झाली आहे. याशिवाय कृषी विभागाने चारसूत्री, कीड नियंत्रण राखण्यासाठी शेतीशाळेचा प्रयोग आता हेल्दी आणि उत्तम वाढीसाठी यशस्वीचा मार्ग ठरेल, अशी समाधानकारक स्थिती असताना पावसाचा मुक्‍काम वाढल्याने ऐन काढणीच्यावेळी वरूणराजाची जोरदार “एन्ट्री’ झाली आणि होत्याचे नव्हते झाले.

मावळ तालुक्‍यातील 15 हजार 647 हेक्‍टरपैकी (उसाशिवाय) 13 हजार 419 हेक्‍टर क्षेत्रावर खरिपाचा पेरा झाला आहे. त्यापैकी 12 हजार 664 हेक्‍टरवर भातपीक, तर सोयाबीन 366 हेक्‍टरवर आहे. मात्र परतीच्या पावसामुळे भूईमूग, सोयाबीन धोक्‍यात आले आहे. अवकाळी पाऊस भातपीक फायदा होत असला तरी वादळी वाऱ्यामुळे दाणे भरलेल्या पिकाला फटका चांगलाच फटका बसला आहे.

गतवर्षीच्या तुलनेत यंदा दीडपट अधिक पाऊस झाला आहे. पावसामुळे खरिप हंगाम जोरात आहे. भातपिकाबरोबरच अन्य कडधान्य पिकांची समाधानकारक वाढ झाली असतानाच परतीच्या पावसामुळे पिकांची नासाडी केली आणि शेतकऱ्यांच्या हाताशी आलेले पीक हिरावून घेतले.

मावळ तालुक्‍यात 12 हजार 664 हेक्‍टर क्षेत्रावर भातपिकाची लागवड झाली आहे. परतीच्या पावसाने मावळातील सुरवातील काही क्षेत्राला फटका बसला. परंतु त्यानंतर पडणाऱ्या पावसामुळे भातशेतीचे अधिक नुकसान झाले. कृषी विभाग, मंडल अधिकारी, तलाठी आणि ग्रामसेवकांनी नुकत्याच केलेल्या प्रत्यक्ष पंचनाम्यानुसार अवेळी पडणाऱ्या पावसामुळे सुमारे पाच हजार हेक्‍टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे.
– देवेंद्र ढगे, तालुका कृषी अधिकारी, मावळ

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.