पुणे – गेल्या काही महिन्यांपासून प्रसिद्ध संगीतकार ए आर रेहमान यांच्या पुण्यातील शोची सर्वत्र जोरदार चर्चा होती. रेहमान पुण्यात येणार म्हंटल्यावर गर्दी ही होणारच होती. गर्दी झाली देखील शो देखील रंगात आला आणि अचानक स्टेजवर पुणे पोलिसांची एंट्री झाली. पोलिसांनी थेट रेहमानला सुनवायला सुरुवात केली. यानंतर जे घडलं त्याने समोर असलेले प्रेक्षकही थंडावले. पोलीस आल्यानंतर रेहमानने आपला गाशा गुंडाळायला घेतला.
गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेला ए आर रेहमान यांचा शो अखेर पुण्यातील राजाबहाद्दूर मिल परिसरात पार पडला. यावेळी आपल्या आवडत्या संगीतकाराला पाहण्यासाठी अनेक जण लांबून लांबून आले होते. अशात सुरु झाला आणि सुंदर रित्या पार देखील पडला. यावेळी पुणे पोलीस दलातील काही अधिकारी देखील या शोसाठी हजर असल्याचं बोललं जातंय.
शो ऐन रंगात आला होता. प्रेक्षकांकडून देखील वन्स मोर येत होता. अशात घड्याळात दहाचा ठोका पडला मात्र तरीही रेहमान यांनी आपला शो आणि म्युजिक सुरूच ठेवलं होत. मग काय स्टेजवर थेट पोलीस अधिकारी अवतरले आणि त्यांनी रेहमान शो बंद करण्यास सांगितलं. न्यायालयाच्या नियमाप्रमाणे दहा नंतर तुम्ही शो करू शकत नाहीत तुम्हाला माहिती नाही का ? बंद करा ते असं पोलीस अधिकाऱ्यांनी यावेळी रेहमानला खडसावल्याचे समजते.
पोलीस अधिकाऱ्यांनी खडसावताच रेहमानने जास्त वेळ वाया न घालवता आणि पोलिसांशी कोणतीही हुज्जत न घालता थेट आपला बारदाना आवरायला घेतला. ऐन शो रंगात आल्यानंतर पोलीस स्टेजवर आल्याने अनेक चाहत्यांचा हिरमोड झाला.