कात्रज, दि. 4 – जिल्हास्तरीय 14 वर्षांखालील विविध वजनी गटातील मुले व मुली निमंत्रित कुस्ती स्पर्धेचे आयोजन शिवछत्रपती स्टेडियम म्हाळुंगे बालेवाडी येथे करण्यात आले होते. त्यामध्ये 430 कुस्तीगीरांनी सहभाग घेतला होता. पुणे शहर राष्ट्रीय तालीम संघ व पुणे जिल्हा कुस्तीगीर संघ व पिंपरी चिंचवड कुस्तीगीर संघ यांच्या विद्यमाने याचे आयोजन करण्यात आले होते.
हिंदकेसरी पै. योगेश दोडके, पै. हनुमंत गावडे, पै. संदीप भोंडवे पै. ज्ञानेश्वर(माऊली) मांगडे यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या स्पर्धेच्या आर्थिक नियोजनाची जबाबदारी पुणे शहर राष्ट्रीय तालीम संघाचे विश्वस्त पै. तात्यासाहेब भिंताडे यांनी उचलली होती. स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र केसरी, आंतरराष्ट्रीय, शिवछत्रपती पुरस्कार सन्मानित, पै. अभिजीत कटके, युवा नेते पै. कुलदीप कोंडे, तसेच कुस्तीगीर संघटनेतील विविध पदाधिकाऱ्यांच्या हस्ते झाले. पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे सचिव कुस्ती कोच पै. मारुती मारकड, पै. जगमाल सिंग, कुस्ती कुस्तीकोच पै.अमोल यादव, कुस्ती कोच पै. वरूण त्यागी यांनी उत्कृष्ट खेळाडू निरीक्षक म्हणून भूमिका बजावली.