कात्रज, दि. 4 – शिवसेनेच्या वतीने वकिलांचा सहभाग असलेल्या लीगल सेलची स्थापना करण्यात येत आहे. यात अडीचशे वकिलांची नोंदणी आतापर्यंत झाली असून, तीन वर्षांपासून तयारी सुरू असल्याचे ऍड. संभाजी थोरवे यांनी सांगितले. शिवसेनेच्या माध्यमातून राज्यातील गोरगरीब जनता, शिवसैनिकांना मोफत कायदेविषयक सल्ला देण्याचा निश्चय या वकील सेनेमार्फत केला गेला.
पुण्यामध्ये दि.3 रोजी शिवसेना भवन येथे झालेल्या बैठकीत शहरप्रमुख गजानन थरकुडे, संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी वकील सेनेचे शहरातील कार्य कशाप्रकारे केले जाईल याबाबत ज्येष्ठ विधीज्ञ ऍड. संभाजी थोरवे यांनीही माहिती दिली. ज्यांची आर्थिक स्थिती अपुरी आहे व योग्य सल्ला न मिळाल्याने, ज्यांना वकिलांची गरज असूनही सल्ला मिळत नाही. अशा व इतर कायदेशीर समस्यांसाठी ही वकील सेना त्यांना मार्गदर्शन करणार असल्याचे थोरवे यांनी सांगितले. ही माहिती बैठकीमध्ये फोनद्वारे विभागीय सह संपर्कप्रमुख पश्चिम महाराष्ट्र उपनेते रवींद्र मिर्लेकर, संपर्कप्रमुख पुणे शहर व जिल्हा आमदार सचिन अहिर यांना सांगण्यात आली. हा प्रस्ताव आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे देणार असल्याचे सांगण्यात आले. बैठकीचे आयोजन ऍड. प्रल्हाद कदम व लक्ष्मण घुले यांनी केले. यावेळी ऍड. सारिका पवार, ऍड. धनश्री बोऱ्हाडे ऍड. विशाल तुपे, ऍड. मनीष भंडारे यांच्यासह वकील बांधव उपस्थित होते.