मुंबई – शेअर बाजाराचे निर्देशांक उच्च पातळीवर असल्यामुळे आता काही गुंतवणूकदार नफा काढून घेण्याच्या मनस्थितीत आहेत. त्यामुळे सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार निर्देशांकात घट झाली.
बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 33 अंकांनी कमी होऊन 62,834 अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 4 अंकांनी म्हणजे 0.03 % ने वाढून 18,701 अंकावर बंद झाला.
रिलायन्स इंडस्ट्रीज, टेक महिंद्रा, अल्ट्राटेक सिमेंट, डॉक्टर रेड्डीज, ऍक्सिस बॅंक, भारती एअरटेल, बजाज फिनवर्व्ह, महिंद्रा या कंपन्याचे शेअर विकून गुंतवणूकदारांनी नफा काढून घेतला. टाटा स्टील, एनटीपीसी, स्टेट बॅंक, इंडसइंड बॅंक, पॉवर ग्रीड या कंपन्यांचे शेअर वधारले.
जपान, चीन, हॉंगकॉंग, दक्षिण कोरिया येथील शेअर बाजाराचे निर्देशांक वाढले होते. मात्र युरोप आणि अमेरिकेतील शेअर बाजार निर्देशांक कमी झाले होते. जागतिक संस्थागत गुंतवणूकदारांनी शुक्रवारी 214 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केल्याची आकडेवारी शेअर बाजारांनी जाहीर केली.
विश्लेषकांनी सांगितले की आता गुंतवणूकदारांचे लक्ष सात डिसेंबर रोजी झाला जाहीर होणाऱ्या रिझर्व्ह बॅंकेच्या पतधोरणाकडे असणार आहे. छोट्या कंपन्यांच्या शेअरची खरेदी झाल्यामुळे स्मॉल कॅप 0.25 टक्क्यांनी तर मिड कॅप 0.10 टक्क्यांनी वाढला.
धातू, बॅंकिंग, वित्तीय सेवा क्षेत्राचे निर्देशांक वाढले तर ग्राहक वस्तू, माहिती तंत्रज्ञान, दूरसंचार, तेल आणि नैसर्गिक वायू क्षेत्राचे निर्देशांक पिछाडीवर होते. दरम्यान भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक सध्या उच्च पातळीवर असल्यामुळे आगामी काळात गुंतवणूकदार सावध राहून व्यवहार करण्याची शक्यता आहे.
………