एक झोका आठवांचा, माझ्या माहेराला जातो…

“अय्या तू पण डोंबिवलीची?’ असं म्हणून जो काही माझ्या चेहऱ्यावर त्या दिवशी एका मैत्रिणीला बघून आनंद पसरला तो तर इथे सांगूच शकत नाही अहो म्हणजे बघा ना! काश्‍मीरसारख्या दूर प्रदेशात असे आपल्या माहेरचे कोणी भेटणे किती ग्रेट ना?

आम्हा बायकांचे कसे असते माहीत आहे? आम्ही कितीही पुढारलो, अगदी जीन्स, मिनीमध्ये आलो तरी मनात जपलेलं माहेर हे जसं पूर्वीच्या बायकांच्या मनात असायचं ना तसंच असतं. कितीही आपण शिकलो, विचारांनी पुढारलो तरी हे वात्सल्याचं लेणं आपण स्त्रियांनी जन्मतःच ल्यायलेलं असतं. कुठलाही सणसमारंभ किंवा कुठे फिरायला गेलो आणि आपल्या माहेरच्या गावातील माणूस भेटला की इतकं छान वाटतं की, जसं काही आपलं गाव, गावातील रस्ते गल्ल्‌या माणसं सगळं सगळं आपल्याला भेटलं आहे.

पूर्वी ना मुलींची अगदी लहान वयात लग्न व्हायची तेव्हा त्यांना या ना त्या कारणाने माहेरी यायला मिळावं म्हणून काही रीती, परंपरा सांभाळल्या जायच्या. नंतर मात्र हे वय वाढले म्हणजे अठरा, वीस आणि हल्ली तर अगदी तिशीतही लग्न होत आहेत मुलींची, पण माहेर आणि त्याची ओढ मात्र स्त्रीच्या मनात कायम असते.

जिथे आपला जन्म झाला, जिथे आपल्यावर संस्कार झाले, शिक्षण आणि नाती जपली गेली त्या माहेरची ओढ ही सासरी मुलगी कितीही रमली तरी कमी होत नाही.

मी जेव्हा केव्हा माझ्या माहेरी जाते, महिन्यातून एकदा, दोनदा, तर कधीकधी तीनचार महिन्यात जाणं होत सुद्धा नाही, तर तेव्हा मी माझ्या गावात पाऊल टाकले की, माझ्या गावातील रस्ते माझ्याशी बोलतात, गल्ल्‌या जणू मला मिठी मारतात. चौकशी करतात, मायेने अंगावरून हात फिरवतात असेच वाटते. जसजसे आपण आपल्या घराजवळ यायला लागतो, तसतसे कितीही बदल झालेले असले तरीही जुन्या खुणा साद घालतात. इथे आपण खेळायचो, इथेच पहिले भांडण झाले होते अगदी खास मैत्रिणीसोबत. इथेच, अगदी इथेच मी सायकल शिकता शिकता जोरात पडलेले आणि ढोपर फोडून घेतलेलं.

अनेक शेजारी भेटतात, हातात काठी, पिकलेल्या केसांच्या आडून आपल्याला न्याहाळत असल्याचे दिसते, पण ते असते कौतुकाचे न्याहाळणे. ओळखताच आली नाहीस हो! तब्येत सुधारली तुझी! आणि गोरी सुद्धा झालीस. जावईबापू आमच्या मुलीला सुखात ठेवत आहेत हो!

हे आणि असे अनेक कौतुक सोहळे होतात माहेरच्या रस्त्यावर, गल्ल्‌यात, आणि सोसायट्यांमधून. मूठभर मांस चढते अंगावर कारण आपण जसं माहेर जपलेलं असतं तसंच सासरसुद्धा सांभाळत असतो जे त्यांच्या कौतुकातून दिसतं.
तुमची सून किती हो सुंदर स्वयंपाक करते, आणि बोलते ही किती लाघवी असे जेव्हा कोणी सासरी म्हणते तेव्हा आठवते आई, तिचे संस्कार आणि तिने लावलेली कडक शिस्त. माहेरचे वळण चांगले आहे हो असं जेव्हा सासू म्हणते तेव्हा उंचावते मान आपल्या गावाची, घराची, आई-बाबांची आणि आपल्या लाडाच्या माहेराची.

आपल्याला सासरी भरभरून सुख मिळत असतं, सासरची माणसं खूप चांगली असतात, पण माहेरची ओढ नाही हो सुटत! आणि माहेरचं नातं नाही हो तुटत! अगदी माझ्या सासूबाई, किंवा इतर कोणत्याहि वयस्क स्त्रीशी माहेरविषयी बोला, तिच्या डोळ्यात जी चमक असते ना ते असतं माहेर आणि त्याचं नातं माहेरचं अंगण, तुळशीवृंदावन, अगदी घरातील प्रत्येक कोपरा जपलेला असतो आपण आपल्या मनात, जो कप्पा असतो सोनेरी ज्याची चमक कधीही कमी होत नाही, उलट दिवसेंदिवस वाढतच जाते. शेवटी माझ्या कवितेतील चार ओळी देते…
एक झोका आठवांचा
माझ्या माहेराला जातो…
अंगणात पावलांचा
ठसा आईचा दिसतो…

असं आईचं, बाबांचं, अनेक अमूल्य आठवणींचं माहेर म्हणजे आपल्या जीवाची पंढरीच नाही का?

– मानसी चापेकर

Leave A Reply

Your email address will not be published.