पौड – मुळशी तालुक्यातील खेचरे व बेलावडे गावा दरम्यान असलेल्या एका खाजगी प्लाँटींगच्या गेटवर स्वराज रक्षक न्युजचे बातमीदार सोमनाथ सुभाष नाडे( वय – ३६ वर्ष, रा. जांबे, ता. मुळशी, जि. पुणे ) यांना अज्ञात पाच जणांनी दांडक्यांनी, लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून त्यांच्या जवळ असलेली त्यांची चारचाकी गाडीही फोडली आहे.
पौड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमनाथ नाडे हे बेलावडे व खेचरे दरम्यान असलेल्या एका खाजगी प्लाँटींगवर जागेची लाईव्ह टेलीकास्ट करणेसाठी गेले होते. यावेळी तेथील गेटवर असलेल्या सुरक्षारक्षकाने साहेबांची परवानगी घेतली आहे का? असे नाडे यांना विचारले. ‘साहेबांची परवानगी नसल्याने तुम्हाला आत सोडता येणार नाही’ असे सुरक्षारक्षकाने सांगितले. त्यानंतर गेटवर असलेल्या इतर चार जणासह पाच जणांनी मिळून नाडे यांना ‘तु येथून निघून जा, नाहीतर खल्लास करेन’, अशी धमकी देत लाकडी काठीने पोटात, डोक्यावर, तोंडावर, पाठीवर व हाताने लाथाबुक्यानी बेदम मारहाण केली.
तसेच नाडे यांच्या सेन्ट्रो ( क्र. एम.एच. १५ डी सी ३९७३) गाडीच्या काचा फोडून नुकसान केले आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली महिला सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वाती सुर्यवंशी या करीत आहेत.