पाटण -कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण कायम आहे. पाणलोट क्षेत्रातील नवजा व कोयना यांच्या तुलनेत महाबळेश्वरमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाची नोंद झाली आहे. पावसाची संततधार कायम असल्याने धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. धरणातील पाणीसाठा 53.53 टीएमसीवर पोहोचला आहे. तर पायथा वीजगृहातून 2100 क्युसेक पाण्याचा विसर्ग कायम आहे.
पाणलोट क्षेत्रात सततच्या पडणाऱ्या पावसामुळे धरणातील पाण्याची आवक वाढली आहे. सध्या कोयना धरणात प्रतिसेकंद 55 हजार 279 क्युसेक पाण्याची आवक होत आहे. तर धरणाची पाणी पातळी 2 हजार 111 वर पोहोचला आहे. पावसाने जून महिन्यात पूर्णपणे उघडीप दिल्याने कोयना धरणाचा पाणीसाठा अत्यल्प होता. कोयना धरणाचे वर्षअखेरीचा महिना जून असतो. त्यामुळे पश्चिमेकडील वीज निर्मितीसाठी तसेच पूर्वेकडील सिंचनासाठी जास्तीत जास्त पाण्याचा वापर करण्यात येतो.
जूनअखेर पाणीसाठ्याच्या वर्षाअखेरीस अत्यल्प पाणीसाठा धरणात शिल्लक राहतो. एक जुलैनंतर वर्षाच्या सुरुवातीस कोयना पाणलोट क्षेत्रात तुरळक स्वरूपाचा पाऊस पडल्याने धरणाचा पाणीसाठा हळूहळू वाढत गेला. परंतु जुलैनंतर कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात विक्रमी वाढ झाली आहे. सहा जुलै रोजी धरणातील पाण्याची आवक प्रति सेकंद 30 हजार क्युसेक एवढी होती तर धरणातील पाणीसाठा 19.4 टीएमसी एवढा होता. नंतर 16 जुलैपर्यंत नऊ दिवसांत कोयना धरणात तब्बल 29.54 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे नऊ दिवसांत कोयना पाणलोट क्षेत्रातील नवजा कोयना व महाबळेश्वर या ठिकाणी दोन हजार मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. त्यामुळे धरणात येणाऱ्या पाण्याची आवकही वाढली आहे. सध्या धरणात येणाऱ्या पाण्याची आवक प्रतिसेकंद 55 हजार 279 हजार क्युसेक एवढी आहे. सध्या कोयना धरणाचा पाणीसाठा 53.53 टीएमसीच्या वर पोहोचला आहे.
तर सध्या पावसाचा जोरही कायम आहे. सध्या कोयना धरणाची पाणी पातळी 2100 फूट एवढी झाली आहे. पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण जास्त असून पावसाचे पाणी व धरणाच्या विद्युतगृहातून सोडण्यात येणारे पाणी यामुळे कोयना नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. गेल्या 12 तासांत कोयना 41, नवजा 46 तर महाबळेश्वर 60 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. महाबळेश्वर येथील सर्वाधिक 2 हजार 555 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.