मुंबई – अंधेरी उपनगरात आज एक चार मजली इमारत कोसळली. बुधवारी मध्यरात्रीच्या सुमाराला हा प्रकार घडला. त्यात जीवित हानी झाली नसली तरी सहा जण जखमी झाले आहेत.
जुहु गल्लीतील सलामी हॉटेलजवळ ही इमारत असून ती रात्री साडे बाराच्या सुमाराला कोसळली. इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर दहा जण अडकले होते त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. सहा जखमी इसमांना कुपर रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
इमारतीच्या ढिगाऱ्या खाली कोणीही अडकलेले नाही असे स्थानिक रहिवाशांनी सांगितले. दुर्घटनेच्यावेळी इमारतीत राहात असलेल्या सर्व माणसांचा हिशोब लागला आहे.
अग्निशमन दल आणि पोलिसांना तेथे रात्री बराच काळ मदत कार्य करावे लागले. त्यांच्या मदतीमुळेच जखमींना त्वरेने रूग्णालयात पोहचवणे तसेच त्यांना इमारतीच्या पडक्या भागातून बाहेर काढणे शक्य झाले आहे.