देवरिया – जीन्स-टॉप घालून पूजा केल्याच्या रागात 17 वर्षांच्या नातीची आजी- आजोबांनी हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यातील महुआडीह भागात घडली आहे. मुलीच्या आईने या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
नेहा पासवान असे मृत मुलीचे नाव आहे. आजोबा परमहंस, आजी भगना देवी, काका व्यास, काकू गुड्डी देवी, दुसरा काका अरविंद दुसरी काकू पूजा देवी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. अरविंद पासवानचा मित्र राजू यादव आणि रिक्षाचालक हसनैन यांच्याविरोधातही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
नेहाने जीन्स-टॉप घालून पूजा केली. याकारणावरून आजी- आजोबासह घरातील इतर सदस्यांनी जीन्स का घातलीस ? असे म्हणत तिच्याशी वाद घालायला सुरुवात केली. दरम्यान ‘जीन्स सरकारने परिधान करण्यासाठी बनवली आहे, यामुळे मला ती घालायची आहे. मला शिकायचं असून समाजात वावरायचं आहे’ असे उत्तर नेहाने दिले.
नेहाने दिलेल्या उत्तराचा राग आजी-आजोबांना आणि काका-काकूंना आला म्हणून त्यांनी तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. यामध्येच तिचा मृत्यू झाला त्यानंतर नेहाला रुग्णालयात नेण्याच्या कारणावरून हे तिला घेऊन गेले व मृतदेह फेकून दिला. मात्र नेहाच्या आईचा या प्रकरणाचा संशय आला व तिने लगेच आपल्या नातेवाईकांसह नेहाचा शोध चालू केला. अखेर शोधाशोध करत असताना नेहाचा मृतदेह गंडक नदीवरील पुलाजवळ सापडला.