मुंबई – पावसामुळे अनेक रेल्वे लोकल्सचे वेळापत्रक कोलमडून पडले आहे. अशात ठाण्यातील अंबरनाथ लोकल ठप्प झाली असताना एका महिलेने लोकलमधून उतरून पायी जाण्याचा प्रयत्न केला होता. अशात तिचे चार महिन्यांचे बाळ नाल्यात पडून पाण्यात वाहून गेल्याची हृदयद्रावक घटना समोर आली होती. हे बाळ त्याच्या काकांच्या हातातून निसटून नाल्यात पडल्याने वाहून गेले होते. यानंतर अग्नी शमन दलासह एनडीआरएफच्या जवानांनी या बाळाचा शोध सुरु केला.
लोकल अडकून पडल्याने अनेकांनी कल्याणच्या दिशेने चालत जाण्याचा निर्णय केला. मात्र ही वाट सोपी नव्हती चालायला जेमतेम रस्ता त्यात बाजूला वाहणारा नाला. अशात एका बाळाला घेऊन काका आणि बाळाची आई चालत होते. बाळ काकाच्या हातातून निसटले आणि थेट नाल्याच्या वाहत्या पाण्यात पडले. पाण्यासोबत बाळाला वाहताना पाहून आईने हंबरडा फोडला. आईने यावेळी प्रचंड आक्रोश केला.
यावेळेसचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यानंतर अग्नी शमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी बाळाचा शोध सुरु केला. मात्र अद्याप हे बाळ सापडले नसून शोधकार्य सुरु असल्याचे समजते.