मुंबई – अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येमुळे देशभरात एकच खळबळ उडाली होती. अशातच याप्रकरणी आता मुंबई पोलिस आयुक्त परम बीर सिंग यांनी काही महत्वपूर्ण गोष्टींचा उलगडा केला आहे.
मुंबई पोलिसांनी याबाबत केलेल्या तपासात पुढील गोष्टी समोर आल्या आहेत
- मृत्यपूर्वी काही महिन्यांपासून सुशांत बायपोलर डिसऑर्डर या मानसिक आजाराने ग्रस्त होता.
- सुशांतवर बायपोलर डिसऑर्डर आजारासाठीचे वैद्यकीय उपचार सुरु होते अशी माहिती मुंबई पोलिसांना मिळाली आहे.
- पोलिसांनी त्याचा फोन व लॅपटॉप तपासला असता सुशांतने मृत्यूपूर्वी गुगलवर ‘पेनलेस डेथ’ म्हणजेच ‘वेदनारहित मृत्यू’ असं सर्च केल्याचं पोलिसांना आढळलं.
- सुशांतने, ८ जून रोजी आत्महत्या केलेली त्याची माजी व्यवस्थापक दिशा सॅलियन हिचे नाव देखील गुगलवर सर्च केल्याचेही पोलिसांना आढळून आले.
- आत्महत्या करण्याच्या अवघ्या काही तासांआधी सुशांतने त्याचे स्वतःचे नाव गुगलवर सर्च केल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.
दरम्यान, सुशांतची माजी व्यवस्थापक दिशा सॅलियन हिने आत्महत्येपूर्वी आयोजित केलेल्या पार्टीत काही राजकीय नेते उपस्थित असल्याची जोरदार चर्चा सोशल मीडियावर होती. मात्र, “दिशाचा होणारा पती रोहन रॉय याच्यासह पार्टीत पाच जण उपस्थित होते. पण त्यात कोणतेही राजकीय नेते नव्हते. दिशाने मध्यरात्री ३ वाजता आत्महत्या केली. आम्ही सीसीटीव्ही फुटेज तपासले असून संबंधित व्यक्तींचा जबाब नोंदवण्यात आला आहे.” अशी माहिती मुंबई पोलिस आयुक्त परम बीर सिंग यांनी दिल्याने दिशाच्या पार्टीत राजकीय नेते उपस्थित असल्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.