पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – महापालिकेकडून मागील महिन्यात शहरात ३८५ रस्त्यांचे सर्वेक्षण करताना सुमारे ६२७ पेक्षा अधिक गतीरोधक अशास्त्रीय मानकांनुसार उभारण्यात आल्याचे निदर्शनास आले. विशेष म्हणजे, याची माहितीच महापालिका प्रशासनाकडे नसल्याची बाब समोर आल्याने वाहतूक सुरक्षिततेच्या या महत्त्वपूर्ण मुद्याचीच आदळआपट पालिका प्रशासनाकडून सुरू असल्याचे उघड आहे.
सजग नागरीक मंचाकडून या सर्वेक्षणानंतर महापालिकेच्या पथ विभागाकडे तीन वेळा माहिती मागण्यात आली तसेच एका शास्त्रीय गतीरोधकाला प्रत्येकी १०० रूपये बक्षीस देण्याची घोषणाही करण्यात आली. महापालिकेच्या पथ विभागाला एकही गतीरोधक मानकांनुसार नसल्याची खात्री असल्याने त्यांच्याकडून माहितीच देण्यात येत नसल्याचे समोर आले आहे.
सजग नागरीक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी मागील तीन आठवडयांपासून प्रत्येक सोमवारी माहिती अधिकारांतर्गत पालिकेत गतीरोधकांची माहिती मागविली. मात्र, पालिकेकडून कोणत्या रस्त्यावर कोणत्या ठिकाणी किती गतीरोधक आहेत याची कोणतीही माहिती मंचाला उपलब्ध करून देता आली नाही. सर्व्हे कोणी, नेमका कधी, केव्हा केला याची माहितीही मंचाला देण्यात आलेली नाही.
महापालिकेने मानकांप्रमाणे असलेले गतीरोधक दाखविल्यास त्यांना प्रत्येक गतीरोधकास १०० रुपये मिळवा, असे खुले आव्हान मी एक महिन्यापूर्वी दिले, त्याप्रमाणे मी गेले तीन सोमवार पाच हजार रुपये घेऊन पथ विभागात जात आहे. मात्र, महापालिका माहिती देण्यास तयार नाही .- विवेक वेलणकर, अध्यक्ष, सजग नागरीक मंच