पुणे -मुंबई-पुणे दररोज प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची “जीवनवाहिनी’ असलेल्या डेक्कन क्विनचा (दख्खनची राणी) आज (दि. 1) 94वा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. बॅन्डच्या आवाज आणि केक कापून “हॅपी बड्डे ट्यु यू’ म्हणत दख्खनच्या राणीचा प्रवास सुरू झाला. यावेळी आनंदीमय वातावरण आणि सजावट यामुळे पुणे स्टेशन परिसरही उत्साहाने फुलून गेला होता.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सकाळी केक कापून दख्खनच्या राणीचा वाढदिवस साजरा करण्यात आला. रेल्वेच्या इंजिनाचे पूजन पाटील यांनी केले. यावेळी रेल्वे प्रवासी ग्रुपच्या चेअरमन हर्षा शहा, स्टेशन डायरेक्टर मदनलाल मिना, जनसंपर्क अधिकारी अजय कुमार यासह प्रवाशी उपस्थित होते. सुरभी बॅंडच्या वादनामध्ये डेक्कन क्वीन सकाळी सात वाजून 15 मिनिटांनी मुंबईला रवाना झाली. यावेळी प्रवाशांनी पुणे-मुंबई प्रवासात डेक्कन क्विन सजवत, छोटे-मोठे केक कापत आणि जुन्या आठवनी सांगत आनंद साजरा केला.
पुणे-मुंबई प्रवास करणाऱ्यांचे डेक्कन क्वीन सोबत एक वेगळे नाते निर्माण झाले आहे. घरातल्या व्यक्तीचा वाढदिवस असल्यावर ज्याप्रमाणे लगबग असते, तशीच लगबग मला येथे पहायला मिळाली. संघटनेकडून अत्यंत उत्साहामध्ये रेल्वेचा हा वाढदिवस साजरा करण्याची अभिनव कल्पना सुरू केली ही कौतुकास्पद आहे.