पुणे – ऑनलाइन वेबसाइटवरून छोटा भीमची खेळणी खरेदी करणे एका व्यक्तीला महागात पडले. खेळणी तर मिळालीच नाही. मात्र, त्याच्या नादात सायबर चोरट्याने 44 हजार 321 रुपयांवर डल्ला मारला. याप्रकरणी एरंडवणे येथील एका 46 वर्षीय व्यक्तीने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
फिर्यादी यांनी “ब्लू हर्ट’ या वेबसाइटवरून ग्रीन गोल्ड स्टोअर्स, हैद्राबाद येथून छोटा भीम प्रकारची खेळणी खरेदी केली होती. ती कधी पोहोच होणार आहेत, हे पाहण्यासाठी संबंधित स्टोअर्सच्या वेबसाइटवरील क्रमांकावर संपर्क केला. त्यावेळी समोरील व्यक्तीने त्यांचा विश्वास संपादन करून बॅंक खात्याची गोपनीय माहिती मिळवली. त्यानंतर त्याच माहितीचा वापर करून फिर्यादीच्या बॅंक खात्यातून पैसे लंपास केले.