लखनौ – उत्तर प्रदेशातील एटा जिल्ह्यातील राजकारणाचा एक प्रमुख चेहरा असलेले कुंवर देवेंद्र सिंह यादव ( Kunwar Devendra Singh Yadav) यांनी रविवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. एटा- कासगंज येथे भाजपचे गणित बिघडवण्याच्या प्रयत्नात असलेले समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्यासाठी हा मोठा हादरा असल्याचे मानले जाते आहे.
१९७६ मध्ये सक्रिय राजकारणात उतरणारे देवेंद्र सिंह यादव माजी खासदार आहेत व आपल्या राजकीय कारकीर्दीचा श्रीगणेशा त्यांनी कॉंग्रेस पक्षासोबत केला. त्यानंतर संघर्षाच्या काळात आणि समाजवादी पक्षाच्या स्थापनेच्या अगोदर ते मुलायम सिंह यादव यांच्या खांद्याला खांदा लावून उभे होते. सरपंच, आमदार आणि नंतर खासदार असा त्यांचा प्रवास राहीला आहे.
१९९९ आणि २००४ असे सलग दोन वेळा ते एटा येथून समाजवादी पक्षाच्या तिकिटावर लोकसभेत पोहोचले आहेत. तत्पूर्वी अनेक वर्षे ते कासगंज जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. त्यांची आणि मुलायम सिंह यादव यांची अत्यंत घनिष्ठ मैत्री होती. मुलायम उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाल्यावरही देवेंद्र सिंह यादव यांना भेटण्यासाठी सतत त्यांची घरी येत असत.
आता देवेंद्र यांनी भाजपची वाट पकडल्यामुळे या भागातील राजकीय समीकरण पूर्ण बदलले आहे. त्याचे कारण एटा मतदार संघात यादव आणि लोधी मतदारांचा दबदबा आहे. येथे सध्या भारतीय जनता पार्टीचे नेते आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याणसिंह यांचे पुत्र राजवीर सिंह खासदार आहेत. राजवीर हे लोधी समुदायाचे आहेत. आता यादव समुदायाचे देवेंद्र यादवही भाजपसोबत आल्यामुळे विरोधकांना ही जागा जिंकणे अवघड जाणार आहे.
ब्राह्मण चेहराही जोडला
देवेंद्र सिंह यादव यांच्यासोबतच बहुजन समाज पक्षाचे नीरज मिश्रा यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मिश्रा हे ब्रह्मण समाजातील मोठा चेहरा मानले जातात. राजवीर यांनी यादव आणि ब्राह्मण असे दोन्ही वर्ग आपल्याकडे वळवून मोठी चाल खेळली आहे. त्याचा उत्तर प्रदेशातील या भागात भाजपला मोठा लाभ मिळण्याची शक्यता आहे.