कात्रज (पुणे) – दुचाकीवरून आलेल्या टोळक्याने दोघा तरुणांवर कोयत्याने वार करत गोळीबार केल्याची घटना कात्रज येथील संतोष नगर परिसरात घडली. भर रस्त्यात गर्दीच्या ठिकाणी सायंकाळी घडलेल्या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीतील कात्रज परिसरात, संतोषी माता मंदिरा जवळील घुंगरूवाला चाळ येथे सायंकाळी सात वाजताच्या सुमारास अज्ञात टोळक्याने दोघा तरुणांवर हल्ला केला. गोळीबारही केला. या घटनेत कोयत्याने एका तरुणाच्या डोक्यात वार केले. तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी अधिक तपास भारती विद्यापीठ पोलीस करत आहेत.
ऐन रमजानच्या महिन्यात सायंकाळच्या वेळी घडलेल्या या घटनेने कात्रज परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या भागात मारामारीच्या अशा घटना वारंवार घडत आहे. कात्रज परिसरातील संतोष नगर, अंजनी नगर, साईनगर तसेच शेजारील काही भाग हा अत्यंत दाटीवाटीचा असून या भागामध्ये मोलमजुरी करून स्थलांतरित झालेले लोकवस्ती आहे.