- मोशीच्या ग्रामदैवताची यात्रा
- आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वोच्च बोली
पिंपरी – करोनाच्या पार्श्वभूमीवर मर्यादित स्वरूपात पार पडलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील मोशी (ता. हवेली) येथील ग्रामदैवत नागेश्वर महाराजांच्या यात्रा उत्सव परंपरेनुसार पार पडलेल्या लिलावात मानाच्या विड्याला यंदा प्रथमच सर्वाधिक रकमेची तब्बल 91 लाखांची बोली लागली. तर मानाच्या ओटीला सोळा लाखांची बोली लागली. गणेश तुकाराम कुदळे हे मानाच्या विड्याचे मानकरी ठरले तर मानाची ओटी वासुदेव बाळाजी आल्हाट व धोंडिबा बाळाजी आल्हाट यांनी बोली लावून तब्बल सोळा लाख पंचवीस हजार रुपयांना मिळविली. मोशी गावच्या इतिहासात आज प्रथमच महाराजांच्या मानाच्या विड्याला एवढी मोठी बोली लावण्यात आली.
यावेळी बोली लावण्याचा मान सालाबादप्रमाणे केदारी कुटुंबाला देण्यात आला होता. यामध्ये प्रामुख्याने नारायण केदारी, सागर केदारी, निखिल केदारी हे उपस्थित होते. लिलावा दरम्यान श्री नागेश्वर महाराज देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त व माजी उपमहापौर शरद बोऱ्हाडे, नितीन सस्ते, नगरसेवक सागर हिंगणे, हरिभाऊ सस्ते, प्रभाकर बोराटे, निलेश बोराटे, अतिश बारणे व मोजके ग्रामस्थ उपस्थित होते.
नागेश्वर सभामंडपात शनिवारी (दि.13) सकाळी दहा वाजता लिलावाला सुरुवात झाली. अवघ्या दोन तासांत नागेश्वर महाराजांचा मानाचा विडा, मानाची ओटी व इतर वस्तुंचा लिलाव मोजक्या ग्रामस्थांच्या उपस्थितीत पार पडला.
उत्सवातील वस्तूंचा लिलाव हा पंचक्रोशीतील भाविकांच्या दृष्टीने एक विशेष पर्वणीचा सण असतो. त्याकरिता नागेश्वर महाराजांच्या चरणी भेट स्वरुपात वर्षभरात आलेल्या सर्व वस्तू जमविल्या जातात. त्यांचा एकत्रित पद्धतीने लिलाव केला जातो. त्यामुळे लिलाव पाहण्यासाठी सभा मंडपामध्ये भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. यंदा मात्र करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी यात्रा रद्द करण्यात आल्याने अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत ही परंपरा पार पाडण्यात आली. दरवर्षी या लिलावामध्ये भाविकांनी अर्पण केलेल्या सोन्या चांदीच्या वस्तूंचा व भंडाऱ्यातील प्रसाद व वस्तूंचा बोली लावून लिलाव केला जातो. ग्रामस्थांकडून भंडाऱ्यातील महाप्रसाद बनविण्याची भांडी दरवर्षी नव्याने खरेदी केली जातात.