रोम – कोविड -19 च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पुढील आठवड्यापासून इटलीमध्ये नव्याने निर्बंध लागू केले जात आहेत. अर्ध्याहून अधिक इटलीमध्ये शाळा, दुकाने आणि रेस्टॉरंट्स बंद राहतील, रहिवाशांना काम, आरोग्य किंवा इतर आवश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडता येणार नाही. 3 ते 5 एप्रिल दरम्यान इस्टर शनिवार व रविवार रोजी संपूर्ण देशभर अतिशय धोकादायक “रेड झोन’ जाहीर केलेला असणार आहे. या देशात आतापर्यंत एक लाखहून अधिक नागरिकांनी करोनामुळे आपला जीव गमावला आहे.
इटलीचे पंतप्रधान मारिओ द्रॅगी यांनी करोना विषाणूची “नवीन लाट’ येण्याचा इशारा दिला आहे. मुलांच्या शिक्षणावर, अर्थव्यवस्थेवर आणि प्रत्येकाच्या मानसिक आरोग्यावर या निर्बंधांचा परिणाम होईल याची आपल्याला जाणीव आहे. मात्र परिस्थिती अधिक बिघडू नये यासाठी हे निर्बंध आवश्यक आहेत. असे ते म्हणाले.
इटलीमध्ये गेल्या सहा आठवड्यांपासून दररोज 25,000 पेक्षा जास्त करोना रुग्ण वाढत आहेत. इटलीच्या लसीकरण मोहिमेलाही उशीर झाला असून, लसीची कमतरता दूर करण्यासाठी ऑक्सफोर्ड-ऍस्ट्रॅजेनेका लसच्या दोन लाख पन्नास हजार डोसची निर्यात गेल्या आठवड्यात इटालियन सरकारने रोखली आहे.