नवी दिल्ली – घाई गडबडीत केलेल्या कामामुळे काही वेळा गोंधळ होतो. आपल्याकडून गडबडीत काही चूक झाली असेल तर सॉरी म्हणून वेळ निभावून नेली जाते आणि विषय तेथेच संपवला जातो. मात्र प्रत्येक जण एवढ्या सहजपणे चुकीतून सहीसलामत बाहेर पडण्यास नशीबवान नसतो. काहींना अत्यंत क्षुल्लक चुकीचीही मोठी किंमत मोजावी लागते. साधी-सरळ वाटणारी प्रकरणे थेट कोर्टाची पायरी चढायला लावतात आणि पैसे देऊन त्यातून सुटका करावी लागते.
सोशल मीडियावर (Social Media) आता अशाच एका प्रकरणाची चर्चा रंगली आहे. यात एका महिलेच्या अंगावर कॉफी सांडल्यामुळे तिने त्या विरोधात थेट न्यायालयाचे दार ठोठावले आणि विशेष म्हणजे तिला नुकसान भरपाई देण्याचे आदेश न्यायालयानेही दिलेत. बरे ही भरपाई थोडीथोडकी नाही, तर आहे तब्बल 24 कोटी. न्यूयॉर्क पोस्टने दिलेल्या बातमीनुसार जॉर्जियाच्या एका महिलेच्या अंगावर रेस्टॉरंटमध्ये कॉफी सांडली. त्याविरोधात तिने 3 दशलक्ष डॉलरची भरपाईची केस दाखल केली. आता तिला याबाबत 24 कोटी रूपये मिळणार आहेत. (compensation of 24 crores)
कॉफी (Coffee) सांडल्यामुळे संबंधित 70 वर्षीय महिलेला दुखापत झाली आणि कसे चालायचे हे तिला नव्याने शिकावे लागले. तिला तिची रोजची कामे करणे आजही जिकरीचे ठरते आहे. हे सगळे गरम कॉफी अंगावर पडल्यामुळे झाले असे त्या महिलेची केस लढणाऱ्या कंपनीच्या वकिलाने सांगितले. भाजल्यामुळे तिला बरेच दिवस रूग्णालयात राहावे लागले आणि त्यामुळे तिचे आयुष्य पूर्वीसारखे राहीलेच नाही. तिला आजही चालताना त्रास होतो आणि उन्हात बाहेर जाता येत नाही असे वकील म्हणाले.
अखेर सुनावणीनंतर हे प्रकरण 24 कोटी रूपयांत मिटले आणि भविष्यात कोणत्या ग्राहकाला इजा होणार नाही अशी खबरदारी संबंधित रेस्टॉरंट घेईल असे वकीलाने नमूद केले.