पुणे – झाडे तोडून त्याची वाहतूक करणाऱ्या ठेकेदाराचा टेम्पो सोडण्यासाठी आणि त्यावर पुन्हा कारवाई न करण्यासाठी शिक्रापूर येथील वनपरिमंडळ अधिकाऱ्याने दहा हजार रुपये लाचेची मागणी केली. संबधित तक्रारदाराकडून लाच घेताना लाचलुचपत प्रतीबंधक विभागाने (एसीबी) वन अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली.
प्रविण अर्जुन क्षीरसागर (वय 40) असे अटक केलेल्या वन अधिकाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी शिरुर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलम सात नुसार कारवाई करण्यात आली. याबाबत 43 वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. तक्रारदार हे झाडे तोडणारे ठेकेदार असून त्यांनी ठेका घेतलेली झाडे तोडून तिची टेम्पोने वाहतूक करत होते. त्यावेळी वन परिक्षेत्र अधिकारी शिरुर प्रादेशिक कार्यालयाच्या अंर्तगत येणाऱ्या वनपरिमंडळ कार्यालय, शिक्रापूर येथील वन परिमंडळ अधिकारी क्षीरसागर यांनी सदर टेम्पो पकडला.
संबंधित टेम्पो सोडण्यासाठी आणि पुन्हा कारवाई न करण्यासाठी क्षीरसागर यांनी तक्रारदार यांच्याकडे दहा हजार रुपये लाचेची मागणी केली. परंतु लाच दिली नाही तर टेम्पो सोडणार नाही, याची खात्री झाल्यावर एसीबीकडे तक्रार देण्यात आली. माहितीची खातरजमा केली असता, वनपरिमंडळ कार्यालय परिसरात सापळा लावण्यात आला. त्यानुसार तक्रारदार यांचेकडून दहा हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास एसीबी पुणे युनिटचे पोलीस निरीक्षक भरत साळुंखे करत आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे व अपर पोलीस अधीक्षक सूरज गुरव यांचे मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीहरी पाटील यांनी दिली आहे.