कार्ला – पाटण येथे एका घराशेजारी असलेल्या रस्त्यावर 15 फूटी अजगर आढळून आला. परंतु शिवदुर्गच्या टीमने वेळीच धाव घेत रेस्क्यूू ऑपरेशन राबवून या अजगराला त्याच्या नैसर्गिक आधीवासात पुन्हा सोडून दिले. त्यामुळे पाटणकरांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
पाटण हे गाव विसापूर किल्ल्याच्या पायथ्याशी व डोंगरालगत असल्याने या भागात अनेकदा वन्यजीवांचा वावर असल्याचे दिसून आले आहे. पाटण येथील एका ग्रामस्थाने शिवदुर्ग मित्र संस्थेला फोनद्वारे माहिती दिली की गावातील पाटोळे यांच्या घराशेजारील रस्त्यावर एक अजगर आढळला.
माहिती मिळताच शिवदुर्गच्या पथकातील हर्ष तोंडे व दुर्वेश साठे यांनी तत्काळ धाव घेऊन अजगराला पकडले. हा अजगर इंडियन रॉक पायथन प्रकारातला असून, या अजगराने भक्ष्य शोधण्यासाठी नागरी वस्तीजवळ आसरा घेतला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्याला पकडून जंगलात सोडून देण्यात आले, अशी माहिती शिवदुर्ग मित्र संस्थेने दिली.
वन्यजीव आढळून आल्यास त्यांना इजा न पोहोचवता शिवदुर्ग संस्थेशी संपर्क साधावा. या जीवांना पुन्हा सुरक्षितपणे त्यांच्या अधिवासात सोडणे शक्य होईल, असे आवाहन शिवदुर्गच्या वतीने करण्यात आले आहे.