पुणे – सदनिकेच्या बाजूला सुरु असलेले बेकायदा बांधकाम रोखल्याने एका गृहनिर्माण सोसायटीच्या सेक्रेटरी व महिला उपाध्यक्षाला मारहाण करण्यात आली . ही घटना येरवडा फुलेनगर येथील हरिगंगा सोसायटीमध्ये घडली. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी प्रताप साळुंके व त्याच्या इतर नऊ साथीदारांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी कपिल पांडे(43) हे सोसायटीचे सेक्रेटरी आहे. तर प्रताप याची त्यांच्या सोसाटीती पहिल्या मजल्यावर सदनिका आहे. प्रतापने त्याच्या घराच्या गॅलरीमध्ये बेकायदा खोली बांधण्यास सुरवात केली होती. यामुळे सोसायटीच्या सभासदांना घेऊन कपिल हे त्याच्याकडे गेले होते. त्यांनी बकायदा बांधकाम थांबवावे अशी मागणी केली. याचा राग मनात धरुन प्रतापने त्याच्या साथीदारांना बोलावून घेतले. त्यांनी कपिल, महिला उपाध्यक्षा इतर सभासदांना शिवीगाळ करत मारहाण केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार आरोपी प्रताप हा महापालिकेच्या मंजूर असलेल्या आराखड्याव्यतिरीक्त त्याच्या सदनिके बाहेर अनधिकृत खोली बांधत होता. ही जागा सोसायटीची कॉमन जागा आहे. त्याला समजावून सांगण्यास गेलेल्या सदद्यांना त्याने साथीदारांच्या मदतीने मारहाण केली. प्रताप हा एका खासगी कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. याप्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक ननवरे करत आहे.