नवी दिल्ली – करोना महामारीच्या काळात रुग्णांवर उपचार करणाऱ्या सरकारी डॉक्टरांना भलेही करोना-योद्धा म्हणून शाब्दिक गौरवले गेले असेल. मात्र, दिल्ली राज्यातल्या अशा करोना योद्ध्यांना अद्यापही वेतन मिळाले नसल्याचे समोर आले आहे. राज्यातील रुग्णालयात काम करणारे कोविड वॉरियर्स गेल्या काही दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत.आपल्या वेतनाच्या मागणीसाठी या वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले असून या आंदोलकांसोबत आता दिल्लीतील तीनही महापालिकेच्या महापौरांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे.
केजरीवाल यांच्या घरासमोर उत्तर दिल्लीचे महापौर जय प्रकाश, पूर्व दिल्लीचे निर्मल जैन आणि दक्षिण दिल्लीच्या महापौर अनामिक सिंह यांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे.अशा तीनही महापौरांनी रस्त्यावरच बैठक मारली असून डॉक्टराच्या थकित वेतनाची मागणी केली आहे. सरकारने आमच्यासोबत संवाद साधला पाहिजे. डॉक्टर आणि इतर वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पगाराचा गुंता सोडविण्याची गरज आहे. दिल्ली सरकारकडे 13 हजार कोटींची थकबाकी आहे. त्यामुळे, जोपर्यंत मुख्यमंत्री आमच्याशी बातचीत करणार नाहीत, तोपर्यंत आम्ही मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर आंदोलनावर बसूनच राहणार असे तीनही महापौरांनी म्हटलं आहे. तर म्युन्सिपल कॉर्पोरेशन डॉक्टर असोसिएशनचे प्रमुख आर. आर. गौतम यांनी म्हटले आहे की, जोपर्यंत पगारासंदर्भातील आमची मागणी मान्य होत नाही, तोपर्यंत आम्ही सुट्टीवरच राहणार आहोत. जर गेल्या महिन्यांचे वेतन अदा केले नाही, तर सर्वच कर्मचारी बेमुदत संपावर जातील.