मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरला जे लोकप्रियतेचे वलय मिळाले आज तेच महेंद्रसिंग धोनीला मिळाल्याचे पाहायला मिळत आहे. सचिनचे फॅन्स सचिनसाठी वाट्टेल ते करण्यास तयार असताना पाहिले गेले तेच चित्र आता धोनीच्या बाबतीत घडताना दिसते. तमिळनाडूतील एका गावात असा एक अवलिया फॅन आहे की ज्याने धोनीच्या व चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या प्रेमाखातर आपले संपूर्ण घरच चेन्नईच्या पिवळ्या रंगात रंगवले आहे.
इतकेच नाही तर त्यावर हाऊस ऑफ धोनीज फॅन अशी पाटीही बसवली आहे. दक्षिण भारतात तसेही कलाकार किंवा क्रिकेटपटूच नाही तर राजकारण्यांचे फॅन अशा काही गोष्टी करतात की जे उर्वरित देशात पाहायला मिळत नाहीत. धोनीला प्रेमाने थाला म्हणणारे हे त्याचे चाहते त्याच्यासाठी काय करतील याचाही नेम राहिलेला नाही.
तमिळनाडूतील अरंगुर या दुर्गम गावात राहणारा गोपी कृष्ण नावाचा हा धोनीचा चाहता असाच एक अवलिया आहे. चेन्नई सुपर किंग्ज संघाचे खेळाडू पिवळ्या रंगाची जर्सी परिधान करतात. त्याच रंगाच्या चित्रकारीने गोपीने आपले घर रंगवले आहे. तसेच त्यावर एका नवोदित कलाकाराकडून धोनीचे चित्रही रंगवून घेतले आहे. घराच्या भिंतीवर धोनीचे चित्र काढून त्याने वेगवेगळे संदेशही लिहिले आहेत.
सध्या अमिरातीत सुरू असलेल्या आयपीएल स्पर्धेत धोनीच्या चेन्नई संघाची कामगिरी रसातळाला जात असली तरीही गोपीला त्याच्याशी काहीही देणेघेणे नाही. धोनीने देशाला तसेच चेन्नई संघाला एक उंची गाठून दिली आहे. त्यामुळे यंदा त्यांची कामगिरी सुमार झाली असली तरीही आमची त्याच्यावरच श्रद्धा असल्याचे गोपी अभिमानाने सांगतो.
आयपीएलमधील कामगिरीमुळे सध्या धोनीच्या खेळावर, नेतृत्वावर तसेच चेन्नई संघाच्या कामगिरीवर जोरदार टीका सुरू असली तरीही धोनीच संघाला या अपयशाच्या गर्तेतून बाहेर काढेल व यंदा नाही पण पुढील वर्षीच्या आयपीएलमध्ये निश्चितच विजेतेपद मिळवून देईल, असा अगम्य विश्वास गोपी व्यक्त करतो तेव्हा दक्षिण भारतातील चाहत्यांची मानसिकता काय असते याची प्रचिती येते.
हे चाहते आता धोनीसाठीही वाट्टेल ते करायला मागेपुढे पाहात नाहीत हेच खरे. एकदा असाच धोनीच्या चाहत्यांनी त्याचे एक पोस्टरही दक्षिणेत झळकावले होते. त्यात धोनीला चक्क भगवान विष्णूचा अवतार बनवले होते. त्यावेळी या पोस्टर्सवरून खूप मोठे वाद निर्माण झाले होते.
असो, हे केवळ धोनीच्या बाबतीतच नाही तर अनेक खेळाडूंच्या बाबतीत घडते. सचिनचा फॅन सुधीर गौतम किंवा उत्तर प्रदेशातील धोनीचा फॅन सर्वानन आणि रामबाबू यांनी तर सचिनच्या फॅनसारखे संपूर्ण शरीर पिवळ्या रंगात रंगवून घेत त्यावर धोनीचे नाव टाकत सामने पाहिल्याचे नेहमी दिसते.
आता याच फॅन्सचा विश्वास टिकून राहो व पुढील वर्षी मार्चमध्ये सुरू होत असलेल्या आयपीएल स्पर्धेचे विजेतेपद धोनीच्या चेन्नईला मिळो तरच या फॅन्सचा विश्वासही टिकून राहिल व भारतीय क्रिकेटला असे फॅन सातत्याने मिळत राहतील व नवनवे स्टार खेळाडू यशाचे इमले रचताना दिसतील.
– अमित डोंगरे