पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संलग्न महाविद्यालयात परीक्षा कामात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी एकूण 19 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. यात बहुतांशपणे प्राध्यापकांचा समावेश आहे. या प्राध्यापकांना 2021 वर्षात परीक्षेचे कोणतेही काम करण्यास मनाई करण्यात आली आहे.
विद्यापीठ अधिकार मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार परीक्षा व त्याच्याशी संबंधित कामात प्रमाद केल्याचे निष्पन्न झाल्याने परीक्षा प्रमाद समितीच्या निर्णयानुसार 19 जणांवर 2020-21 मध्ये परीक्षेचे कोणतेही काम करण्यास बंदी घातली आहे. एका महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर घातलेली बंदी उठविण्यात आली आहे, तर तीन प्राध्यापकांना देण्यात आलेल्या शिक्षेच्या पुनर्विचाराच्या निवेदनावर निर्णय घेऊन त्यांना परीक्षेचे नियमित कामकाज करण्यास परवानगी दिली आहे.
बारकोड चुकीचा लावणे, प्राश्निक म्हणून काम करत असताना जमा केलेल्या प्रश्नसंचामध्ये आढळून आलेल्या त्रुटी, बहिस्थ पॅटर्नऐवजी नियमित पॅटर्नची प्रश्नपत्रिका देणे, आदी प्रकारांसाठी ही कारवाई करण्यात आली. प्राध्यापकांनी दिलेले अंतर्गत गुण आणि महाविद्यालयाने पाठविलेले ऑनलाइन गुण यामध्ये तफावत असणे आणि उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन निष्काळजीपणे केलेल्या प्राध्यापकांना देण्यात आलेल्या शिक्षेच्या पुनर्विचाराच्या निवेदनावर निर्णय घेऊन त्यांना परीक्षेचे नियमित कामकाज करण्यास परवानगी दिली आहे.
कारवाई करण्यात आलेले प्राध्यापक शहरातील नामांकित महाविद्यालयांमध्ये कार्यरत आहेत.