पिंपरी – रस्त्याने जाणाऱ्या नागरिकाला विजेच्या उघड्या तारांमुळे शॉक लागला. यामुळे ते नागरिक रस्त्यावर कोसळले आणि त्याचवेळी वेगात आलेल्या एका ट्रकने त्यांना चिरडले. डोक्यावरून ट्रकचे चाक गेल्याने पादचारी व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि. 19) सायंकाळी साडेसहा वाजता पुणे-नाशिक महामार्गावर धावडे वस्ती, भोसरी येथे घडली. याबाबत महावितरणच्या संबंधित कर्मचाऱ्यासह ट्रक चालकावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रवी महादेव जोगदंड (वय 45, रा. अजंठानगर, निगडी) असे मृत्यू झालेल्या पादचारी व्यक्तीचे नाव आहे. याबाबत त्यांचा भाऊ धीरज महादेव जोगदंड (वय 29, रा. चऱ्होली) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि. 20) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी ट्रक चालक विठ्ठल लक्ष्मण राठोड (वय 34, रा. उंब्रज शिवडे, ता. कराड, जि. सातारा) आणि एमएसईबीचा संबंधित कर्माचारी याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजता मयत रवी पुणे-नाशिक महामार्गावरून धावडेवस्ती, भोसरी येथून रस्त्याने पायी चालत जात होते. रोशन गार्डन समोरून रस्ता ओलांडत असताना त्यांना डिव्हायडर वरील विद्युत खांबावरील उघड्या तारेचा शॉक लागला. यात जखमी झालेले रवी रस्त्यावर पडले. ट्रक चालक राठोड चालवित असलेला ट्रक जोगदंड त्यांच्या डोक्यावरुन गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. महावितरणच्या कर्माचाऱ्यांनी त्यांच्या कामात हलगर्जीपणा, निष्काळजीपणा करून रस्त्यावरील खांबावरील वायर झाकून न ठेवता उघडी ठेवली. यामुळे हा अपघात झाला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी ट्रक चालकाला अटक केली आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.
यापूर्वी देखील विद्युत रोहित्राची व्यवस्थित देखभाल न केल्यामुळे तो फुटून एका चिमुकलीसह तिघींचा मृत्यू झाल्याची घटना दीड महिन्यांपूर्वी इंद्रायणीनगर, भोसरी येथे घडली होती. त्यावेळी देखील महावितरणच्या अधिकाऱ्यांवर निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल झाला होता. आता पुन्हा महाविरतणच्या संबंधित कर्मचाऱ्यांवर निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल झाला आहे.