पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी व बारावीच्या पुरवणी परीक्षा येत्या 20 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत. फेब्रुवारी-मार्च 2020 मध्ये दहावी व बारावीची परीक्षा घेण्यात आली होती. यात अनुत्तीर्ण झालेल्या व ए.टी.के.टी.साठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आता पुरवणी परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जुलै-ऑगस्टमध्ये या परीक्षा घेता आल्या नाहीत. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये या परीक्षा होणार आहेत.
पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत पुरवणी परीक्षा घेण्याचे जाहीर करण्यात आले आहे. दहावीची लेखी परीक्षा 20 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर या कालावधी होणार आहे. बारावीच्या सर्वसाधारण व द्विलक्षी विषयासाठी 20 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर या कालावधीत तर व्यवसाय अभ्यासक्रमासाठी 20 नोव्हेंबर ते 7 डिसेंबर या कालावधीत परीक्षा होणार आहेत. दहावीच्या प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा या 18 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर या कालावधीत होणार आहेत. तसेच बारावीसाठी या परीक्षा 18 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर या कालावधीत होणार आहेत.
परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक राज्य मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. ही वेळापत्रकाची सुविधा फक्त माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा व उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय यांच्याकडे विभागीय मंडळामार्फत छापिल स्वरुपात दिलेलेच वेळापत्रक अंतिम राहणार आहे.
छापील वेळापत्रकावरुनच परीक्षेच्या तारखांची खात्री करुन घ्यावी व विद्यार्थ्यांनी परीक्षेस प्रविष्ट व्हावे. अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने किंवा खासगी यंत्रणेने छपाई केलेले व व्हॉटसऍप किंवा तत्सम माध्यमातून व्हायरल झालेले वेळापत्रक ग्राह्य धरु नये, असे राज्य मंडळाचे सचिव डॉ.अशोक भोसले यांनी स्पष्ट केले आहे.