अहमदनगर – भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षात प्रवेश करणार अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. मात्र, ‘ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे भाजपामधून जवळपास बाजूलाच पडले आहेत. आता फक्त मुहूर्त ठरवायचा आहे की, इकडे का तिकडे कुठे जायचे’, असे म्हणत शिवसेना नेते माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी सस्पेन्स वाढवला आहे.
आज नगरमध्ये खोतकर यांना खडसे शिवसेनेत येतील का असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना खोतकर म्हणाले की, हा निर्णय शेवटी त्यांचा आहे. आपण काही म्हणलो तरी निर्णय त्यांना घ्यायचा आहे असे खोतकर म्हणाले.
तसेच एकनाथ खडसे भाजप सोडतील का ? असा प्रश्न विचारल्यावर खोतकर म्हणाले, खडसे यांचे भाजप मध्ये आता काय राहिलंय ? जवळपास ते भाजपातून बाजूलाच पडले आहेत. त्यांना त्यांचे चांगले वाईट समजते. म्हणून ते योग्य पक्षातच जातील असे खोतकर म्हणाले.
दरम्यान, कालच केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी खडसे हे पक्ष सोडून कुठेही जाणार नाहीत असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे पुढे नक्की काय होणार याबाबत राजकीय वर्तुळाच चर्चा रंगली आहे.