कॉंग्रेस अध्यक्षपदासाठी उभे न राहण्याचा पं. नेहरूंचा निर्धार
नवी दिल्ली, ता. 12 – “”कॉंग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक जवळ आलेली आहे. कॉंग्रेस अध्यक्षपदाच्या ह्या जबाबदारीच्या जागेसाठी उभा राहावयाचे नाही हे मी पक्के ठरवून ठेवले आहे. ह्या देशव्यापी महान संघटनेचे नेतेपण एकाच व्यक्तीकडे सतत असणे केव्हाही योग्य नाही. कॉंग्रेसच्या उत्कर्षासाठी मी अर्थातच माझ्या जीवात जीव असेपर्यंत झगडीनच; पंरतु कॉंग्रेसच्या आणि देशाच्या भवितव्याच्या दृष्टीने कॉंग्रेसचे अध्यक्षपद दुसऱ्या कुणातरी व्यक्तीकडे जाणे हेच इष्ट आहे. अशी माझी मनोदेवता सांगत आहे,” असे पंतप्रधान श्री. नेहरू यांनी प्रदेश कॉंग्रेस समित्यांना लिहिलेल्या पत्रांत म्हटले आहे.
अनेकवेळा अनेक स्त्री-पुरुष आणि वृत्तपत्रे “नेहरूंनंतर कोण?’ “नेहरूंनंतर भारताचे भवितव्य काय?’ अशा स्वरूपाचे प्रश्न विचारताना आढळून येतात. अशा प्रकारचा प्रश्न म्हणजे केवळ मलाच नव्हे तर देशातील सर्व सुविद्य नागरिकांना आव्हान आहे. भारतासारख्या खंडप्राय देशाच्या भवितव्याची सूत्रे एकादोघां व्यक्तींच्यावर अवलंबून आहे असे मानणे मूर्खपणाचे आहे.
या आव्हानाचा स्वीकार झाला पाहिजे असे माझे मत आहे. आणि कुठल्याही बिकट परिस्थितीत या देशाची सूत्रे योग्य व्यक्तीच्या हातीच राहतील अशी माझी श्रद्धा आहे, असेही नेहरू यांनी म्हटले.
उडत्या तबकड्या मुंबईत आल्या
मुंबई, ता. 12 – गेल्या पाच दिवसांत दक्षिण व उत्तर मुंबईतील लोकांना आकाशात भ्रमण करणाऱ्या उडत्या तबकड्यांचे दर्शन झाले.
रात्री चौपाटीवर सहलीस गेलेले एक व्यापारी डी. जी. जोशी म्हणाले- कुलाब्याकडून दादरकडे वेगाने जाणारी एक प्रकाशमान तबकडी मी पाहिली. प्रथम मला उल्कापातच वाटला, पण ती खाली येत नसल्याने काही निराळेच असावे असे वाटले. ती एक फूट परिघाची असावी. मध्यभागी काळा ठिपका होता व वर्तुळाच्या कडेस प्रकाश दिसत होता. तो अग्नीप्रमाणे होता. तबकडी अतिशय वेगाने सरळ चालली होती. धूर निघत नव्हता, आवाज येत नव्हता. क्षणार्धात ती दिसेनाशी झाली. सुमारे 100 लोकांनी ही उडती तबकडी पाहिली आहे. एका विद्यार्थ्याने ती क्राउन नाण्याएवढी असल्याचे सांगितले.