क्रिकेट काॅर्नर : गावसकरांच्या मागणीचा विचार व्हावा

-अमित डोंगरे

विक्रमादित्य सुनील गावसकर यांनी टी-20 क्रिकेटमधील नियमांत काही बदल व्हावेत, अशी अपेक्षा व्यक्‍त केली होती. त्यांनी सांगितलेल्या काही गोष्टींचा विचार केला तर त्यांना अपेक्षित असलेले बदल झाले तर खरोखर गोलंदाजांवरील अन्याय दूर होऊ शकतो. 

क्रिकेटचा खेळ फलंदाजांसाठीच आहे, असे ठामपणे सांगितले जाते. काहीअंशी ते खरेही आहे. कारण एखादा गोलंदाज कशी कामगिरी करतो हे पाहण्यासाठी प्रेक्षक मैदानावर गर्दी करत नाहीत तर फलंदाजाची कामगिरी पाहण्यासाठी जनसागर लोटतो, पण दुसऱ्या बाजूने विचार केला तर असे जाणवते की फलंदाजांना न्याय देण्याच्या नादात गोलंदाजांवर अन्याय होत आहे. मुळातच क्रिकेटच्या अत्यंत वेगवान प्रकारात हीटआऊट गेटआऊट याच प्रकारची फलंदाजी होते. 

चेंडू तंत्राने फटकावला का चुकीने हे कोणीही विचारत नाही, पाहातही नाही. धावा येतात हेच महत्त्वाचे हेच सूत्र पाळले जाते. गोलंदाजाला मर्यादित जास्तीत जास्त चार षटके गोलंदाजी करायला मिळते. तसेच त्यात एक उसळता चेंडू टाकला की दुसरा उसळता चेंडू टाकण्याची परवानगी नसते. गोलंदाजांवर हा अन्याय नव्हे का? जर फलंदाज व गोलंदाज यांना समान संधी द्यायची असेल तर नियमांत गावसकर म्हणतात तसे काही प्रयोग केले गेले तर हरकत नसावी.

गोलंदाजाला एका षटकात दोन उसळते चेंडू टाकायला परवानगी असावी. सध्या सुरू असलेल्या आयपीएल स्पर्धेची मैदाने व त्याच्या सीमारेषांच्या अंतराची मोजणी केली तर त्या खूपच छोट्या असल्याचेही सिद्ध होते. अशा वेळी या सीमारेषांच्या अंतरातही वाढ व्हावी, तसेच जर एखाद्या गोलंदाजाने चार षटकांत जास्त बळी घेतले असतील तर त्याला एक षटक जास्त टाकण्याचीही मुभा मिळावी, अशी गावसकर यांनी केलेली मागणी काही प्रमाणात का होईना पण रास्त वाटते. असे काही बदल निदान टी-20 क्रिकेटमध्ये केले गेले तर ते जास्त रोमांचक होईल यात शंका नाही.

मांकडिंगबाबतही त्यांनी केलेली सूचना निश्‍चितच चांगली वाटते. गोलंदाजाने चेंडू टाकण्यापूर्वी जर नॉन स्ट्रायकर फलंदाजाने क्रीझ सोडले असेल तर गोलंदाज त्याला मांकडिंग पद्धतीने बाद करू शकतो हे तर क्रिकेटच्या नियमानुसारच आहे, पण त्याचबरोबर स्ट्राईकवर असलेल्या फलंदाजही देखील गोलंदाजाने चेंडू टाकण्यापूर्वी क्रीझ सोडून पुढे येत असेल तर त्याच्या संघाला एका धावेचा दंडही केला जावा, असेही गावसकर यांच्या मागणीत नमूद केले आहे. त्यातही वावगे काही वाटत नाही. कारण जर फलंदाज क्रीझ सोडत असेल तर ती एक प्रकारची धावाचोरीच आहे हे कोणीही नाकारणार नाही. अर्थात त्यासाठी टीपीकल भारतीय मानसिकताही बदलावी लागेल यात शंका नाही.

जर क्रिकेटला सज्जनांचा खेळ असे संबोधले जात आहे तर मग त्यात केवळ फलंदाजांचाच विचार का केला जातो. गोलंदाज उपेक्षित का राहतात हेदेखील विचारात घेतले गेले पाहिजे. उदाहरणच द्यायचे झाले तर विराट कोहली खेळत असेल तर मैदाने भरली जातात व गोलंदाजांवर तो कसे वर्चस्व राखतो ते पाहिले जाते. मात्र, त्यावेळी अन्य कोणी खेळाडू गोलंदाजी करत असेल तर त्याच्याकडे साफ दुर्लक्ष केले जाते.

क्रिकेटचा खेळ फलंदाजांच्या कामगिरीसाठीच पाहिला जातो हे खरे असले तरीही त्यात गोलंदाजालाही वाव दिला गेला तरच फलंदाजाच्या कामगिरीची तसेच त्याच्या महानतेची पारख होईल. उसळते चेंडू, यॉर्कर चेंडू, स्विंग किंवा स्वर्व्ह चेंडू खेळताना फलंदाजाची गुणवत्ता सिद्ध होते. तसेच बलाढ्य फलंदाजावर वर्चस्व राखता आले तर गोलंदाजाच्याही गुणवत्तेची साक्ष पटते. त्यासाठीच गावसकर यांच्या मागणीचा एकदा तरी गांभीर्याने विचार केला जावा हीच अपेक्षा आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.