पुणे – ऍण्ट करप्शनचे अधिकारी असल्याचे सांगत एका ज्येष्ठ नागरिकास लूटण्यात आले. त्याच्या गळ्यातील सोन्याची चेन, अंगठी व हातातील घड्याळ कागदात गुंडाळून ठेवण्याच्या बहाण्याने हातचलाखी करत लांबवण्यात आले. या ऐवजाची किंमत 40 हजार इतकी होती. याप्रकरणी अलंकार पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी रामचंद्र दत्तो कुलकर्णी(77,रा.सिंहगड रस्ता) यांच्या बंगल्याचे काम कर्वेनगर येथे सुरु होते. ते त्या ठिकाणी जाऊन पहाणी केल्यावर घरी परतत होते. यावेळी त्यांना दोन अनोळखी व्यक्तींनी आवाज देऊन बोलावून घेतले. यानंतर त्यांना लो चलो हमारा साहेब उधकर खडा है, साहब को मिलो तुमको मालूम नही क्या सोना पहनके घुमना नही, हम ऍण्टी करप्शनके लोग है, आपके सुरक्षा के लिए घुम रहे है.
यानंतर त्यांच्यासमोर एका व्यक्तीस थोबाडीत मारण्याचे नाटक करण्यात आले. कुलकर्णी यांना गळ्यातील सोन्याची चेन, अंगठी व हातातील घड्याळ काढून देण्यास सांगण्यात आले. यानंतर ते कागदाच्या पुडीत गुंडाळून फिर्यादीला पिशवीत ठेवण्यास सांगण्यात आले. फिर्यादीने थोड्या अंतरावर जाऊन पिशवी उघडली असता, त्यामध्ये दिलेला ऐवज नसल्याचे लक्षात आले. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक साळवी करत आहेत.