कराची – पाकिस्तानच्या इलेक्ट्रॉनिक मीडिया नियामक प्राधिकरणाने नवे निर्देश जारी केले आहेत. त्यानुसार एखाद्या प्रॉडक्टची जाहीरात करताना त्या प्रॉडक्टशी सुसंगत नसणाऱ्या थीमचा अथवा कंटेटचा वापर केला जाउ नये, असे बजावण्यात आले आहे.
तेथील एक कलाकार महविश हयातच्या एका जाहीरातीवरून पाकिस्तानात सध्या गदारोळ सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर या निर्देशांना विशेष महत्व प्राप्त झाले आहे.
महविश हयातचा वेगळा परिचय म्हणजे तिचे नाव कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्याशी जोडले गेले आहे. त्यामुळे ती सध्या प्रकाशझोतात आली आहे.
महविशने केलेली गाला बिस्किटाची जाहीरात सध्या प्रसारीत केली जात आहे. मात्र ती तेथील लोकांच्या पचनी पडलेली नाही. या जाहीरातीत महविश नृत्य करताना दाखवली आहे. मात्र हा प्रकार पाकिस्तानी समाजाच्या विरोधातील असल्याचा दावा केला जातो आहे. सोशल मीडिया आणि काही पत्रकारांनी तर या जाहीरातीची मुजरा अशा शब्दांत संभावना केली आहे.
पाकिस्तानची सध्याची स्थिती खराब आहे. मुलांना शिक्षण मिळत नाही, लैंगिक शोषणाच्या घटना वाढल्या आहेत, प्राध्यापक लोकांची हत्या केली जात आहे आणि लोकांना त्यापेक्षा बिस्किटाच्या जाहीरातीची अधिक चिंता वाटत असल्याचा सूरही सोशल मीडियावर उमटला आहे.
पाकिस्तानचे संसदीय कार्यमंत्री अली मोहम्मद यांनीही या जाहीरातीबद्दल नाराजी व्यक्त करताना हा प्रकार इस्लामच्या विरोधात असल्याचे म्हटले असून त्यामुळे युवा पीढीवर वाईट परिणाम होतील असे म्हटले आहे.
महविश गेल्या काही काळापासून पाकिस्तानात विशेष चर्चेत आहे. ती दाऊद इब्राहिमची खासमखास असल्याची चर्चा तेथील माध्यमांतून सुरू असते. इतकेच नव्हे, दाऊदच्या कनेक्शनमुळेच तिला पाकिस्तानचा तमगा ए इम्तियाज हा नागरिक सन्मान बहाल करण्यात आल्याचाही दावा केला जातो आहे. एका आयटम सॉंगमध्ये दाऊदने तिला पाहिले होते. तो त्यानंतर इतका प्रभावित झाला की तिला अनेक मोठे चित्रपट मिळायला सुरूवात झाली असा दावाही काही बातम्यांतून करण्यात येतो आहे.