केंद्राच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये विविध उपाय योजनांवर भर
नवी दिल्ली – चित्रपट प्रदर्शनासाठी आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाशी चर्चेनंतर या मार्गदर्शक सूचना निश्चित करण्यात आल्या आहेत. केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज या मार्गदर्शक सूचना जारी केल्या.
गृहमंत्रालयाच्या निर्णयानुसार 15 ऑक्टोबरपासून चित्रपटगृहे खुली होणार आहेत. यामध्ये प्रवेश करणाऱ्या सर्वांचे आणि कर्मचाऱ्यांचीही तापमान तपासणी, पुरेसे शारीरिक अंतर राखणे, मास्कचा वापर, सातत्याने हात धुणे, हॅंड सॅनिटायझरचा वापर, कर्मचाऱ्यांची सुरक्षा, बाहेर पडण्यासाठी ठराविक मार्ग इत्यादीची व्यवस्था असणे आवश्यक आहे.
याशिवाय एकूण क्षमतेच्या पन्नास टक्केच आसनक्षमता वापरली जाईल याची काळजी घेणे आवश्यक. मल्टिप्लेक्समधे चित्रपटाच्या वेळा एकापाठी एक न ठेवता विखूरलेल्या असाव्यात. चित्रपटगृहातील तापमान 24 अंश ते 30 अंश सेंटिग्रेड दरम्यान असणे आवश्यक आहे. चित्रपट प्रदर्शनाला सुरूवात करतानाच सर्व राज्ये व संबंधितांनी ह्या मार्गदर्शक सूचनांचा वापर करावा.
चित्रपटांचे प्रदर्शन सुरू करणे ही मोठी आर्थिक घटना असून आपल्या देशाच्या जीडीपीवर त्याचा सकारात्मक परिणाम होईल. आताच्या कोविड-19 च्या साथीच्या पार्श्वभूमीवरही चित्रपट प्रदर्शन सुरू करताना सर्व संबंधितांनी ही साथ पसरू नये म्हणून काळजी घेणे महत्त्वाचे आहे, असे जावडेकर यांनी म्हटले आहे.
गृहमंत्रालयाने 30 सप्टेंबरला चित्रपटगृहे, थिएटर, मल्टीप्लेक्स उघडण्यासाठी जारी केलेल्या याव्यतिरिक्तच्या मार्गदर्शक तत्वांनुसार प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील चित्रपटगृहे 15 ऑक्टोबरपासून उघडली जातील, असे म्हटले होते.