नितीन महाजन यांची ग्वाही
शिक्रापूर(पुणे)- शिक्रापूर गावठाण परिसरात अनेक दिवसांपासून विजेचा प्रश्न भेडसावत आहे. याबाबत विद्युत वितरण विभागाला वारंवार पत्रव्यवहार करून देखील दाद देत नसल्याने अखेर आज माहिती सेवा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी उपकार्यकारी अभियंता नितीन महाजन यांची भेट घेतली. त्यांनी आठ दिवसांत हा प्रश्न सोडविणार असल्याचर ग्वाही दिली.
शिक्रापूर गावठाण परिसरातील भैरवनाथ मंदिर, बाजार मैदान, काळे आळी यांसह आजुबाजूच्या ठिकाणी अनेक दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. कमी-अधिक दाबाच्या वीज पुरवठ्याने गावातील अनेकांच्या घरातील इलेक्ट्रिक वस्तूंचे नुकसान झाले.
या ठिकाणची डीपी दुरुस्त करून विद्युत पुरवठा सुरळीत करण्याबाबत माहिती सेवा समितीच्या वतीने विद्युत वितरण विभागाला निवेदने देत पत्र व्यवहार करण्यात आलेला होता; मात्र विजेचा प्रश्न सुटत नसल्याने आज माहिती सेवा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी शिक्रापूर विद्युत वितरण विभागाचे उपकार्यकारी अभियंता नितीन महाजन यांची भेट घेतली. यावेळी माहिती सेवा समितीचे अध्यक्ष चंद्रकांत वारघडे, शिक्रापूर संतोष काळे, हारून इनामदार, विजय लोखंडे, शंकर सासवडे यांसह आदी उपस्थित होते.