पुणे – शहरात मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या सहा सराईतांना हडपसर पोलिसांनी जेरबंद केले. त्यांच्याकडून तब्बल 18 गावठी बनावटीचे पिस्तूल, 28 जिवंत काडतुसे पोलिसांनी जप्त केली. इतक्या मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा सापडण्याची ही पहिलीच वेळ असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. दरम्यान, या शस्त्रांचे मध्य प्रदेश “कनेक्शन’ असल्याची माहिती समोर येत आहे.
अरबाज रशिद खान (वय 21, रा. शिरुर), सूरज रमेश चिंचणे (वय 22, रा. फुरसुंगी, हडपसर), कुणाल नामदेव शेजवळ ( वय 19, रा. शिरूर), जयेश राजू गायकवाड (वय 23, रा. शिरूर), विकास भगत तौर ऊर्फ महाराज (वय 28, लक्ष्मीनगर, येरवडा), शरद बन्सी मल्लाव (वय 21, रा. शिरुर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
परिमंडळ-5 चे पोलीस उपायुक्त सुहास बावचे यांनी याबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली. वाढत्या घरफोडी, चोरी आणि अन्य गुन्ह्यांबाबत तपास करण्याचे उद्दिष्ट बावचे यांनी हडपसर पोलिसांना दिले होते. त्यानुसार हडपसरमध्ये काही तरुण बेकायदा पिस्तूल बाळगत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी सापळा रचून सहा जणांना अटक केली.
सहायक पोलीस आयुक्त कल्याणराव विधाते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश साठे, पोलीस निरीक्षक हमराज कुंभार, सहायक पोलीस निरीक्षक संजय चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक सौरभ माने, सहायक पोलीस फौजदार युसूफ पठाण, हवालदार राजेश नवले, प्रताप गायकवाड, सैदोबा भोजराव, पोलीस नाईक विनोद शिवले, नितीन मुंढे, गोविंद चिवळे, प्रवीण उत्तेकर, पोलीस शिपाई अकबर शेख, शशिकांत नाळे, शाहिद शेख, प्रशांत टोणपे, अमित कांबळे आणि नरसाळे यांनी ही कारवाई केली.