शिक्रापूर – वाशिम येथील 93 वर्षाच्या आजीने शिक्रापूर (ता. शिरूर) येथील रुग्णालयात उपचार घेत करोनावर मात केली आहे. करोनावर मात करून आजी मूळ गावी रवाना झाली असून आजीच्या नातेवाइकांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.
वाशीम येथे करोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने आजीला करोनाची बाधा झाली होती. त्यांच्या गावी उपचार करणे अशक्य होते. आजीला ऑक्सिजनची गरज होती. त्यांच्या ओळखीचे डॉक्टर शिक्रापूर येथे असल्याने त्यांच्या नातेवाइकांनी त्या आजीबाईला मोठ्या आशेने शिक्रापूर येथे उपचारासाठी दाखल केले होते. चार दिवसांनंतर आजींनी उपचाराला चांगला प्रतिसाद दिला. रविवारी (दि. 20) आजी करोनामुक्त झाल्या. त्यांनतर आज आजीला हॉस्पिटल मधून घरी सोडण्यात आले. यावेळी येथील डॉक्टर, नर्स व कर्मचाऱ्यांनी आजींचे फुलांचा वर्षाव करत स्वागत केले. आजीच्या नातेवाइकांनी सर्व डॉक्टरांचे आभार मानले.
आमच्या आजीचे आयुष्य संपले असे आम्हाला वाटले. म्हणून आम्ही त्यांचा विचारच सोडला होता. परंतू शेवटचा इलाज म्हणून आम्ही आजीला शिक्रापूर येथील हॉस्पिटलमध्ये दाखल केले. येथील डॉक्टरांच्या प्रयत्नाने आमच्या आजीला नवसंजीवनी मिळाली आहे. आम्हाला आमची आजी चांगल्या पद्धतीने घरी जात असल्याचा आनंद वाटत असल्याचे आजीच्या नातेवाईकांनी सांगितले.
शिक्रापूर येथील आमच्या हॉस्पिटलमधून अद्यापपर्यंत 17 रुग्ण करोनामुक्त झालेले आहेत. आज करोना मुक्त झालेल्या 93 वर्षाच्या आजीला जीवदान देण्यात आम्ही यशस्वी झालो आहे. याचे आम्हाला समाधान आहे, असं डॉ. पवन सोनवणे यांनी सांगितले.