पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सुमारे 85 टक्के विद्यार्थी ऑनलाइनद्वारे अंतिम वर्षाची परीक्षा देणार आहेत. मात्र, त्यांना विद्यापीठाकडून परीक्षेपूर्वी प्रश्नसंच उपलब्ध करून दिले जाणार नसल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले. त्याऐवजी नमुना प्रश्नांद्वारे सराव परीक्षा घेतली जाणार आहे.
पदवी व पदव्युत्तरच्या अंतिम वर्षाची परीक्षा ऑक्टोबरमध्ये होत आहे. ही परीक्षा बहुपर्यायी प्रश्न (मल्टिपल चॉईस क्वेश्चन-एमसीक्यू) पद्धतीने होणार आहे. विद्यार्थ्यांनी आतापर्यंत दीर्घोत्तरी प्रश्नांना अनुसरून अभ्यासाची तयारी केली आहे.
आता मात्र “एमसीक्यू’ पद्धतीने प्रश्न विचारला जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थी संभ्रमात आहेत. त्या पार्श्वभूमीवर परीक्षेपूर्वी प्रश्नसंच उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी विद्यार्थ्यांनी राज्य सरकार व विद्यापीठाकडे केली होती.
उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी मुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांना प्रश्नसंच उपलब्ध होतील, अशी ग्वाही दिली होती. त्यावरून पुणे विद्यापीठातील परीक्षार्थीही प्रश्नसंचच्या प्रतिक्षेत होते. मात्र, प्रश्नसंच न देता केवळ नमुना प्रश्नांवरून सराव परीक्षा घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट होत आहे.