न्यूयॉर्क- ग्रीनहाऊस वायूंच्या उत्सर्जनाचे प्रमाण आणि वेग कायम राहिल्यास २१०० पर्यंत जगात समुद्राची पाणी पातळी तब्बल १५ इंचाने वाढण्याचा धोका नासाने केलेल्या एका संशोधनातून समोर आला आहे.
जगातील ३६ पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय संस्थांमधील ६० पेक्षा जेष्ठ शास्त्रज्ञांच्या समूहाने हे संशोधन केले आहे. बर्फाळ प्रदेश, महासागर आणि वातावरण या क्षेत्रात काम करणारे हे सर्व शास्त्रज्ञ आहेत. जगातील विविध देशांमध्ये एकमेकांच्या सहकार्याने काम करणाऱ्या विविध गटांनी सादर केलेल्या निष्कर्षाशी नासाचे संशोधन साधर्म्य साधणारे आहे.
समुद्राची पाणी पातळी वाढण्याच्या कारणांमध्ये सिंहाचा वाटा बर्फाच्या वितळण्याचा असणार आहे असे नासाच्या या अहवालात म्हटले आहे. ग्रीनलँड आणि अंटार्क्टिकामधील बर्फाचे मोठ्या प्रमाणात पाणी होणार असल्याने समुद्राची पातळी वाढणार आहे. नासाच्या माजी शास्त्रज्ञ आणि बर्फाळ क्षेत्राच्या अभ्यासक सोफी नोव्हिकी यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे समुद्राची पाणी पातळी वाढण्यात हिमपर्वत आणि हिमनद्या यांच्या वितळण्याचा वेग महत्वाचा ठरणार आहे. आगामी काही वर्षात हवामानात कसा आणि कोणता बदल होतो हेही महत्वाचे आहे.