पुणे – पुणे पोलिसांनी विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. याचा फटका नांदेडच्या आमदाराली बसला. आलिशान गाडीतून मित्रांबरोबर विनामास्क जाणारे नांदेडचे आमदार अमरनाथ अनंतराव राजूरकर यांच्याकडून पालिका आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी दंड घेतला. त्यांच्याकडून पाचशे रुपये दंड वसूल करण्यात आला. विशेष म्हणजे त्यांच्या गाडीचा पाठलाग करून ही कारवाई केली. राजूरकर हे कॉंग्रेसतर्फे विधान परिषदेवर निवडून आले आहेत.
करोना पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने शहर पोलिसांसोबत शहरात विनामास्क फिरणारे आणि थुंकी बहाद्दरांविरुद्ध जोरदार मोहीम उघडली आहे. शहरात वीस हजारांपेक्षा अधिक लोकांकडून आतापर्यंत दंड वसूल केला.
गुरुवारी सकाळी पालिकेच्या आरोग्य विभागाचे अधिकारी-कर्मचारी तसेच कोथरूड पोलीस स्टेशनचे कर्मचारी शास्त्रीनगर चौकामध्ये कारवाई करत होते. त्यावेळी एका आलिशान मोटारीमधून चारजण विनामास्क जात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
त्यांनी वाहन चालकाला गाडी थांबविण्याचा इशारा केला. परंतु, वाहनचालकाने गाडी न थांबविता भरधाव पुढे निघून गेला. गाडीतील कोणीही मास्क न घातल्याने पोलिसांनी पाठलाग करत काही अंतरावर ही गाडी अडवून कारवाई केली.