पुणे – ज्वेलर्स शॉपमध्ये वस्तू खरेदीच्या बहाण्याने आलेल्या दोघांनी हातचालाखीने ज्वेलर्स शॉप मालकाची सोनसाखळी आणि अंगठी असा 42 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. माणिकबागेत बुधवारी दुपारी हा प्रकार घडला.
याप्रकरणी योगेश घोडके (56, रा. सनसिटी रोड, आनंदनगर) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार दोन व्यक्तीविरोधात सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
फिर्यादी घोडके यांचे माणिकबाग भागात ज्वेलरी शॉप आहे. बुधवारी सव्वाअकरा वाजण्याच्या सुमारास एक व्यक्ती त्यांच्या शॉपमध्ये आली. त्याने डोक्यावर कॅप आणि चेहऱ्यावर मास्क घातला होता. यानंतर त्याने दुकानातील दागिने बघायचा बहाणा केला.
यावेळी त्याचा एक साथीदार बाहेर थांबला होता. आरोपीने फिर्यादींच्या तुमच्या हातातील अंगठी आणि गळ्यातील सोनसाखळी खूप सुंदर असल्याचे सांगून ती पाहण्यासाठी घेतली. त्यानंतर फिर्यादीला बोलण्यात गुंतवून त्यांची अंगठी आणि सोनसाखळी हातचालाखीने लंपास केली.