पुणे – वानवडी पोलिसांनी लॉकडाऊन काळात घरफोडी करणाऱ्या सराईतांना जेरबंद केले. त्यांच्या ताब्यातून तब्बल 32 लाख 53 हजारांचा ऐवज हस्तगत केला. यामध्ये सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह चारचाकी व दुचाकी वाहने हस्तगत केली.
रवीसिंग शामसिंग कल्याणी (22), बितुसिंग शामसिंग कल्याणी (24), हुकुमसिंग रामसिंग कल्याणी (28, सर्व रा. रामटेकडी) अशी अटक आरोपींची नावे आहेत.
वानवडी पोलीस ठाण्यात दाखल घरफोडी, चोरीच्या गुन्ह्यांचा तपास सुरू असताना पोलीस शिपाई नासिर देशमुख व नवनाथ खताळ यांनी गुन्हेगारांच्या घरावर सलग तीन दिवस पाळत ठेवली. त्यानंतर परिमंडळ 5 चे पोलीस उपायुक्त सुहास बावचे व वानवडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील सहायक पोलीस निरीक्षक आसाराम शेटे यांच्या पथकाने पहाटेच्या वेळी सापळा रचून आरोपींना अटक केली.
त्यांच्या चौकशीत त्यांनी जूलै व ऑगस्ट या दोन महिन्यांतील घरफोडी, चोरी, वाहन चोरीचे मिळून 13 गुन्हे केल्याची कबुली दिली. करोना पार्श्वभूमीवर आरोपींना अगोदरच्या गुन्ह्यात जामिनावर सोडले होते. त्यानंतर त्यांनी पुन्हा घरफोडीचा सपाटा लावला होता. तपास पथकातील अधिकारी व कर्मचारी यांना एकूण 15 हजार रुपये कर्तव्य दक्ष कामगिरी बद्दल बक्षीस जाहीर झाले आहे.