महापालिकेत खळबळ; दबाव की ब्लॅकमेलिंग; चर्चांना उधाण
पिंपरी – बॅंक खात्यावर लाच घेतल्याप्रकरणी तसेच मुलगा व्यवसाय करत असतानाही महापालिकेला न कळविल्यामुळे डॉ. अनिल रॉय यांची महापालिका आयुक्तांनी खातेनिहाय चौकशी जाहीर केली आहे. हा प्रकार सहन न झालेल्या रॉय यांनी थेट माहिती अधिकारात महापालिकेच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांची माहिती मागवित “आरटीआय’ बॉम्बच टाकला आहे. आरटीआयचा प्रकार आयुक्तांवर दबाव आणून चौकशीतून खरी माहिती बाहेर पडू नये यासाठी आहे की इतरांना ब्लॅकमेलिंग करण्याच्या उद्देशाने केला आहे, याबाबत आता महापालिका वर्तुळात विविध चर्चांना ऊत आला आहे.
भाजपाचे नगरसेवक तुषार कामठे यांनी जून महिन्यात झालेल्या सर्वसाधारण सभेत डॉ. अनिल रॉय यांच्यासह सुनील लोंढे व सुनील बेळगावकर यांनी श्री कन्स्ट्रक्शन या ठेकेदाराकडून बॅंक खात्यावर लाच घेतल्याचे प्रकरण उजेडात आणले होते. या प्रकरणाची प्राथमिक चौकशी केल्यानंतर हे तीनही अधिकारी दोषी आढळल्याने त्यांच्या खातेनिहाय चौकशीचे आदेश महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी 3 सप्टेंबर रोजी दिले होते. हा आदेश सहन न झालेल्या डॉ. रॉय यांनी थेट “सबको ले डुबेंगे सनम’ याचा प्रत्यय आणून देत महापालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांसदर्भात माहिती अधिकाराखाली माहिती मागविली आहे.
4 सप्टेंबर रोजी डॉ. रॉय यांनी प्रशासन विभागाला माहिती अधिकाराखाली पत्र सादर केले असून, त्यात म्हटले आहे की, महापालिकेच्या अस्थापनेवर कार्यरत असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील व्यापार किंवा धंदा करणाऱ्या व्यक्तीची माहिती संबंधित कर्मचारी अथवा अधिकाऱ्याने महापालिकेला कळविली असल्यास ती माहिती नस्तीतील कागदपत्रांस उपलब्ध करून द्यावी. सदरची माहिती ही महापालिकेत प्रतिनियुक्तीवर असलेल्या अधिकाऱ्यांसह देण्यात यावी. डॉ. रॉय यांनी हे पत्र दिल्यामुळे महापालिकेतील अनेक अधिकारी अडचणीत येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
अनेकजण अडकण्याची शक्यता
महापालिकेतील अनेक अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांची मुले ठेकेदारीमध्ये थेट अथवा इतरांच्या माध्यमातून कार्यरत आहेत. स्थापत्य विभागातील बहुतांश अधिकाऱ्यांच्या मुलांची ठेकेदारी जोमात आहे. याशिवाय वायसीएममधील एका कर्मचारी तसेच पालिकेतील एका लेखाधिकाऱ्याचा मुलगाही ठेकेदारीत आहे. तर एका सहायक आयुक्ताच्या पत्नीच्या नावे व्यवसाय आहे. हे प्रकरण ताणले गेल्यास अनेक अधिकारी अडचणीत येण्याचीच शक्यता वर्तविण्यात येत आहे.
दबाव की ब्लॅकमेलिंग?
आजपर्यंत डॉ. रॉय यांनी अशी कोणतीही माहिती मागविली नव्हती. मात्र अचानक अण्णा हजारेंचा साक्षात्कार झालेल्या रॉय यांनी स्वत:वर बालंट आल्यानंतर घेतलेल्या या पवित्र्यामुळे उलटसुलट चर्चा महापालिका वर्तुळात रंगल्या आहेत. डॉ. रॉय यांनी यापूर्वीही एका चौकशीतून वाचण्यासाठी स्वेच्छानिवृत्तीचा पवित्रा घेतला होता. ही चौकशी टळल्यानंतर त्यांनी आजपर्यंत स्वेच्छानिवृत्तीसंदर्भात “ब्र’ शब्द उच्चारलेला नाही. त्यामुळे त्यांचे माहिती अधिकाराखालील पत्र म्हणजे आयुक्तांवर दबाव वाढविण्याचा प्रकार आहे की इतर अधिकारी कर्मचाऱ्यांना ब्लॅकमेलिंग करण्याचा प्रकार याबाबत चर्चांना उधाण आले आहे.
काहीही केले तरी गच्छंती अटळ
आतापर्यंत वेगवेगळे पवित्र्ये अजमावित आपल्यावरील बालंट दूर करण्यात यशस्वी झालेल्या डॉ. रॉय यांना या वेळी मात्र यश मिळण्याची शक्यता कदापीही नाही. न्यायालयात गेलेले प्रकरण, आरटीआयमुळे वाढलेली विरोधकांची संख्या आणि आयुक्तांविरोधात खासगीत केलेले आश्चर्यकारक दावे त्यातच प्राथमिक चौकशीत दोषी आढळल्यामुळे त्यांची गच्छंती अटळ मानली जात आहे.