पठाणकोट- क्रिकेटपटू सुरेश रैना याच्या काकांच्या घरावर पडलेल्या दरोड्याचा तपास युद्धपातळीवर केला जावा व दोषींना अटक करून रैनाच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रसिद्ध अभिनेते सनी देओल यांनी येथील वरिष्ठ पोलीस अधिकारी वर्गाची भेट घेतली. सनी हे भारतीय जनता पक्षाचे खासदारही असल्याने आता रैनाच्या मदतीसाठी ढाई किलोचा हात मदतीला आला असल्याची चर्चा चांगलीच रंगली आहे.
रैनाच्या काकांच्या घरी दरोडेखोरांनी हल्ला केला होता. यामध्ये त्याच्या काकांचे निधन झाले होते. या प्रकरणाची चौकशी पंजाब पोलीस करत आहेत. पण या तपासाला वेग यावा व दोषींना लवकरात लवकर अटक केली जावी यासाठी सनी यांनी पुढाकार घेतला आहे. रैनाच्या काकांचे घर ज्या भागात आहे तो प्रभाग सनी यांचा मतदारसंघ आहे.
सनीने पठाणकोट भागातील वरिष्ठ पोलीस अधिकारी गुलनीत सिंग खुराना यांची भेट घेतली. या भेटीमध्ये सनीने परिस्थितीचा आढावा घेतला. रैनाच्या कुटुंबीयांचे जे प्रकरण आहे, त्याची मी माहिती घेतली आहे. त्यांना लवकरात लवकर न्याय मिळेल. या हल्लात प्राण गमावलेल्या रैनाच्या कुटुंबियांना माझ्याकडून श्रद्धांजली.
दरोडेखोरांनी केलेल्या हल्ल्यात रैनाच्या काकांचा मृत्यू झाला होता, त्यामुळे रैनाने आयपीएलमधून माघार घेत मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला होता. काकांच्या मृत्यूनंतर काही दिवसांतच त्याच हल्ल्यात जखमी झालेल्या त्याच्या चुलत भावाचाही मृत्यू झाला.
रैनाच्या नातेवाईकांवर पंजाबमधील पठाणकोट जिल्ह्यातील थरियाल गावात 19 आणि 20 सप्टेंबरच्या रात्री हल्ला करण्यात आला होता. आम्हाला अद्याप तेव्हा काय झाले हेच समजलेले नाही. पंजाब पोलिसांनी या प्रकरणावर गंभीर तपास करावा. ज्यांनी हे कृत्य केले त्यांना लवकर अटक करावी, असे मत रैनाने व्यक्त केले होते.