करोनाबाधितांच्या संख्येने 55 हजारांचा आकडा ओलांडला
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात करोनाने हाहाकार उडविला असून, आज शहरातील बाधितांच्या संख्येत पुन्हा मोठी भर पडली. आज दिवसभरात 1041 जणांना बाधा झाल्याचे स्पष्ट झाले असून दिवसभरात सहाजणांचा मृत्यू झाला आहे. आजच्या बाधितांमध्ये शहरातील 1004 जणांचा तर शहराबाहेरील 37 जणांचा समावेश आहे. त्यामुळे बाधितांची संख्या 55 हजार 234 वर पोहोचली असून मृतांची संख्या 1147 वर पोहोचली आहे.
शनिवारी प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांचा अहवाल आज (रविवारी) महापालिकेला प्राप्त झाला. आजच्या अहवालानुसार शहरातील 1004 जणांना तर शहराबाहेरील 37 जणांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. आज मृत झालेल्यांमध्ये शहरातील तिघांचा तर शहराबाहेरील तिघांचा समावेश आहे. मृतांमध्ये शहरातील चिंचवड, दापोडी व भोसरी येथील रुग्णांचा समावेश असून, शहराबाहेरील चाकण, अहमदनगर आणि पश्चिम बंगालमधील तीन रुग्णांचा समावेश आहे.
आतापर्यंत शहरातील 43 हजार 982 जण करोनामुक्त झाले असून शहराबाहेरील 2219 जणांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. आज दिवसभरात करोनाची कोणतीही लक्षणे न आढळल्यामुळे 913 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत 2 लाख 31 हजार 751 जणांच्या घशातील स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी 1 लाख 74 हजार 69 जणांचे अहवाल नकारात्मक आले आहेत. 2448 जणांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. आज नव्याने संशयित असलेले 3541 जण महापालिकेच्या रुग्णांलयांमध्ये दाखल झाले आहेत.