नवी दिल्ली – भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने व्यक्तिगत मागणीनुसार कोविडची चाचणी करण्यास अनुमती दिली आहे. टेस्टिंग ऑन डिमांडचे धोरण आयसीएमआरने मान्य केले असले तरी राज्यांनी त्यांच्या स्थितीनुसार त्याविषयी निर्णय घ्यावा, असेही आयसीएमआरने म्हटले आहे.
तथापि, राज्य सरकारांनी टेस्टिंगच्या सुविधांमध्ये सुलभता आणावी, असेही आयसीएमआरने सुचवले आहे.
कंटेन्मेट झोनमध्ये राहणाऱ्या सर्व शंभर टक्के नागरिकांची रॅपिड ऍन्टिजेन चाचणी करावी, असेही आयसीएमआरने सुचवले आहे. करोना चाचणी केली नाही म्हणून कोणत्याही नागरिकांवरील इमर्जन्सीचे उपचार थांबवले जाऊ नयेत.
गर्भार स्त्रियांना चाचणीअभावी अडवू नये, असेही सुचवण्यात आले आहे. करोनाचा प्रसार रोखण्यासाठी आयसीएमआरने अन्यही काही उपाय सुचवले असून त्या अनुषंगाने त्यांनी सूचनाही जारी केल्या आहेत.