शिक्रापुरात प्रशासनाचा अजब कारभार
शिक्रापूर (पुणे) -शिक्रापूर (ता. शिरूर) येथे यापूर्वी प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे एका करोनाबाधित मृत महिलेचा मृतदेह चार दिवस रुग्णवाहिकेत पडून असल्याचा प्रकार घडलेला असताना पुन्हा एकदा प्रशासनाचा ढिसाळपणा चव्हाट्यावर आला आहे. शिक्रापूरमध्ये करोनाबाधित मृत व्यक्तीचा अंत्यविधी केल्यानंतर मृत व्यक्तीची अंत्यविधीनंतरची शिल्लक असलेली राख व हाडे चार दिवस पडून असल्याचे समोर आले आहे.
शिक्रापूर येथे रविवारी (30 ऑगस्ट) एका करोनाबाधित मृत व्यक्तीवर प्रशासनाकडून अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी ग्रामविकास अधिकारीदेखील उपस्थित होते. वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही माहिती दिली होती; मात्र अंत्यसंस्कारानंतर करोनाबाधित व्यक्तीची राख व हाडे चार दिवसांपासून स्मशानभूमीत पडून राहिली.
अंत्यविधी करताना वापरण्यात आलेले हॅन्डग्लोजही उघड्यावर पडून आहेत. एकीकडे करोनाचे मोठे संकट उभे राहिलेले असताना प्रशासनाकडून नागरिकांच्या आरोग्याशी खेळले जात असल्याचा आरोप येथील नागरिक करीत आहेत. बाधित व्यक्तीच्या अंत्यसंस्कार केल्यानंतर त्याची पुढील खबरदारी घेणार कोण? असा प्रश्न येथील नागरिकांना पडलाय. प्रशासन कुठल्याही प्रकारची दखल घेत नसल्याचा आरोप येथील स्थानिक नागरिक तुषार आळंदीकर यांनी केला आहे.
शिरूर विभागाचे प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता, मी कामात असल्याचे उत्तर त्यांनी दिले.
- याबाबत शिक्रापूर येथील स्थानिक प्रशासनाला तातडीने कार्यवाही करण्याबाबतचे आदेश देण्यात येतील.
-आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद पुणे